सोनसाखळी चोरांच्या दुकलीला अटक ; चोरीचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

मागील आठवड्यात एक वृद्ध महिला मालाडमधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये जाताना एकाने त्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पलायन केले होते. ही घटना सोसायटीच्या व्हिडीओमध्ये कैद झाली होती.

मुंबई : मालाड येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दुकलीला दिंडोशी पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड केले. सोनसाखळी चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रियाज आलम रमजानअली शेख व आकाश प्रल्हाद नाईक अशी दोघांची नावे आहेत. चोरीकरिता वापरलेल्या दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

मागील आठवड्यात एक वृद्ध महिला मालाडमधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये जाताना एकाने त्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पलायन केले होते. ही घटना सोसायटीच्या व्हिडीओमध्ये कैद झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हाच व्हिडीओ असल्याचे उघड झाले. त्यानंतर दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या पथकाने त्या महिलेचा शोध घेतला आणि तिचा जबाब नोंदवून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. सीसी टीव्ही फुटेजची तपासणी करून, तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना मिरा रोड व नालासोपारा येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्या दोघांनी चोरीची कबुली दिली. 

त्यांच्याकडून नालासोपारा व दिंडोशी परिसरातून चोरलेल्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी सोनसाखळीच्या या गुन्ह्यात मोटरसायकलचा वापर केल्याचे उघड झाले. चोरलेली सोनसाखळी आरोपींनी एकाला विकली असली तरी ती लवकरच जप्त केली जाईल. दोन्ही आरोपींविरोधात मुंबई, ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत; परंतु त्या दोघांच्या अटकेमुळे त्या गुन्ह्यांची उकल होऊ शकेल, असे दिंडोशी पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Chain Snecher have been Arrested Video Viral