कल्याण : महापालिका परिवहन समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात ? 

रविंद्र खरात 
मंगळवार, 4 जून 2019

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक 12 जूनला दुपारी 12 वाजता होणार.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक बुधवार ता. 12 जूनला दुपारी 12 वाजता होणार असून या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे पाहणार असून परिवहन समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीमध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून युतीच्या करारानुसार एक-एक वर्ष शिवसेना भाजप सदस्य यांना सभापती पद दिले जाते. यावर्षी शिवसेना सदस्यांना सभापती पद देण्यात येणार आहे. यामुळे शिवसेनेचे सुनील खारूक, बंडू पाटील, अनिल पिंगळे, मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव आदी सदस्य असून शिवसेना कुणाच्या गळ्यात परिवहन समिती सभापती पदाची माळ टाकते, याकडे लक्ष्य लागले आहे. 

वेळ कमी आणि निवडणूक बिनविरोध...?
परिवहन समिती सभापती पद युतीच्या करारानुसार यावर्षी शिवसेनेला देण्यात येणार असल्याने शिवसेनेचा फक्त उमेदवार निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक आचारसंहिता येणार असल्याने आगामी वर्षात पदभार घेणाऱ्या सभापतीला कालावधी कमी मिळणार आहे.

सभापती निवडणूक कार्यक्रम जाहीर...
परिवहन समिती सभापती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे कामकाज पाहणार आहेत. उमेदवारी अर्ज सोमवार ता. 10 जून ला सकाळी 9:45 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत पालिका सचिव यांच्या कार्यालयामध्ये भरायचा आहे. बुधवार ता. 12 जून ला परिवहन समिती सभापती निवडणूकीबाबत दुपारी 12 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा सुरू होताच परिवहन समिती सभापती पदासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रक्रिया करण्यात येणार असून तद्नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम होताच आपल्याला उमेदवारी मिळावे, म्हणून शिवसेना परिवहन समिती सदस्यांची धावपळ सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chairman of the Municipal Transport Committee Election at Kalyan Dombivli