'पैसे, समाजमाध्यमांचा दुरुपयोग रोखणे आव्हान '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नवी मुंबई - सर्व निवडणुकांमधील पैसे व समाजमाध्यमांचा दुरुपयोग रोखणे हे आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे मत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नवी मुंबई - सर्व निवडणुकांमधील पैसे व समाजमाध्यमांचा दुरुपयोग रोखणे हे आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे मत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नवी मुंबई महापालिकेच्या ज्ञान केंद्र सभागृहात सुदृढ लोकशाहीसाठी सुदृढ निवडणुका या विषयावर आयोजित कोकण विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. 74 व्या घटना दुरुस्तीत संस्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यांनाही केंद्रीय निवडणूक आयोगासारखेच अधिकार आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. आयोगप्रसंगी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूकविषयक बाबींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करू शकतो, असा इशाराही सहारिया यांनी दिला. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाचे अधिकृत चिन्ह हवे असेल, तर नोंदणीची पद्धत सुरू केली, खर्चाचा दैनंदिन हिशोब देणे, आश्‍वासनांचा जाहीरनामा तसेच केलेली कामे जनतेसमोर ठेवणे बंधनकारक केले आहे. नामनिर्देशन व शपथपत्र संगणकीकृत करणे आवश्‍यक केले आहे. यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण एक टक्‍क्‍यावर आल्याची माहिती सहारिया यांनी दिली. 

विद्यापीठाच्या पातळीवर जागरूकता 
विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या वेळी "मतदार नोंदणी केली नसल्यास ती करेन' असे लिहून देणे. तसेच त्यांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी देणे, याविषयी आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरुणपिढीत निवडणुका आणि मतदानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी हा यामागील हेतू असल्याचे सहारिया यांनी नमूद केले. या वेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, निवृत्त अपर मुख्य सचिव शहजाद हुसैन, सर्व जिल्हाधिकारी, महापौर जयवंत सुतार उपस्थित होते. 

Web Title: Challenge to prevent misuse of money, social media says Election Commissioner