शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच आव्हान..! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

यंदा शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका लढवणार हे स्पष्ट झाल्याने मुंबईतील काही मतदारसंघांची अदलाबदल करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे गोरेगाव मतदारसंघ भाजपने सुभाष देसाईंसाठी सोडावा, अशी शिवसेनेची मागणी असल्याचा दावा करण्यात येत आहे; तर त्याबदल्यात दादर-माहीम मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई -  शिवसेना भवनच्या परिसरातील दादर माहीम विभागात शिवसेनेत असलेली अंतर्गत दुफळी आणि शिवसैनिकांचा रोष पाहता आता खुद्द दादर-माहीम परिसरातच भाजपचा झेंडा रोवला जाण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे.

शिवसेनेला धक्का देत २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने नितीन सरदेसाई यांच्या माध्यमातून या मतदासंघात आव्हान उभे केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा शिवसेनेत दाखल झालेल्या सदा सरवरणकर यांना शिवसेनेने दिलेली उमेदवारी सार्थ ठरवत गेलेला गड राखला. असे असले तरी आता सरवणकर यांना शिवसेनेतूनच अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना वगळता अन्य कोणाला उमेदवारी मिळण्याची शक्‍यताही दुरापास्त आहे.

त्यातच यंदा शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका लढवणार हे स्पष्ट झाल्याने मुंबईतील काही मतदारसंघांची अदलाबदल करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे गोरेगाव मतदारसंघ भाजपने सुभाष देसाईंसाठी सोडावा, अशी शिवसेनेची मागणी असल्याचा दावा करण्यात येत आहे; तर त्याबदल्यात दादर-माहीम मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भाजपकडून नावांची चाचपणीही सुरू
शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात गेल्या पाच वर्षांत भाजपाने आपला जम बसवला असून विविध समाजकार्य आणि सण उत्सवांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवण्यात बाजी मारली आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आता भाजपसाठी सोडावा, अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी असून भाजपकडून काही नावांची चाचपणीही सुरू आहे. त्यात उद्योजक सचिन शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती भाजपतील सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenge in Shiv Sena in Dadar-Mahim