परीक्षा घेण्याचे विद्यापीठापुढे आव्हान, ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेचा पर्याय

तेजस वाघमारे
Saturday, 29 August 2020

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्याने राज्यातील अकृषी विद्यापीठांपुढे परीक्षा घेण्याचे आव्हान आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्याने राज्यातील विद्यापीठांपुढे परीक्षा घेण्याचे आव्हान आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत विद्यापीठांना परीक्षा पार पाडाव्या लागणार असल्याने मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबई विद्यापीठाला संलग्न महाविद्यालयातील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागणार असल्याने परीक्षेचा कालावधीही दुप्पट लागणार असल्याचे, विद्यापीठातील सुत्रांनी सांगितले. 

मुंबई विद्यापीठामार्फत मार्च महिन्याच्या अखेरीसपासून अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात होते. पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा तीन टप्प्यात या परीक्षा घेण्यात येतात. यंदा कोरोनामुळे परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने एच्छिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केल्याने विद्यापीठाला आता सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागणार आहे.

मोठी बातमी - आली लहर, केला कहर! चोराने चोरलं महावितरण कार्यालयातील हजेरीपत्रक, कर्मचाऱ्यांना लागला शॉक

न्यायालयाने 30 सप्टेंबरनंतरही परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठांना परीक्षा घेण्याबाबत युजीसीला कळवावे लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत लगेच परीक्षेचे आयोजन करणे विद्यापीठाला शक्‍य नाही. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षा घेण्यासाठी युजीसीकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. यापुर्वी परीक्षा तीन तासांच्या घेण्यात येणार होत्या. मात्र, न्यायालयाने परीक्षा कशी, आणि किती तासांची घ्यावी, याबाबत निर्देश दिले नसल्याने विद्यापीठ ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घेण्याचा पर्याय निवडेल, असे विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

  • मुंबई विद्यापीठ दरवर्षी अंतिम वर्षाच्या 400 ते 450 परीक्षा घेते. 
  • रेड झोनमधील महाविद्यालयात परीक्षा कशा घेणार हा प्रश्‍न 
  • परीक्षेसाठी 100 टक्के स्टापची आवश्‍यता भासणार 
  • दरवर्षी अडीच महिने परीक्षा चालतात. 
  • परीक्षेचा कालावधी दुप्पट होणार 

यापुर्वी परीक्षा घेण्यासाठी मार्च अखेर ते जूनपर्यंत अशा सुमारे अडीच महिने परीक्षा घेण्यात येत होती. परंतू यंदा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहचण्यापासून ते त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. एका बेंचनंतर एक बेंच रिकामा ठेवण्यात येणार असल्याने 500 क्षमता असलेल्या परीक्षा केंद्रावर एका वेळी 250 विद्यार्थीच परीक्षा देउ शकतील. त्यामुळे दोन किंवा तीन शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित होउ शकेल, काय याचाही विचार होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा केंद्राचे जंतूनाशक करावे लागणार आहे. परीक्षकांची संख्या वाढवावी लागेल, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. 

मोठी बातमी - मुंबईकरांसाठी गुड न्यूज! महापालिकेकडून दहा टक्के पाणीकपात रद्द

परीक्षेसाठी अशी होते तयारी : 

परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकार मार्गदर्शक तत्वे जाहीर करेल. त्यानुसार विद्यापीठे परीक्षांबाबत परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेईल. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करून परीक्षा केंद्रांवर किती विद्यार्थी परीक्षा देउ शकतील, याची माहिती महाविद्यालयांकडून जमा करावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना हॉलतिकीट वितरीत करण्यात येतील. उत्तरपत्रिकांची छापाई होईल. त्या परीक्षा केंद्रांवर पोहचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येईल. या सर्व तयारीसाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. प्रश्‍नपत्रिकांचे तीन सेट तयार करून ते पाठविण्याची व्यवस्था करावी लागते. परीक्षेनंतर त्या पुन्हा ताब्यात घ्याव्या लागतात. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग झाल्यानंतर पेपर तपासणी होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर होतात. 

( संपादन - सुमित बागुल ) 

challenge of taking exams in front of state government after supreme courts verdict on exams


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenge of taking exams in front of state government after supreme courts verdict on exams