...तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा : पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

 भाजपच्या 288 जागा निवडून येतील, अशी तयारी करा. आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल.

- चंद्रकांत पाटील.

मुंबई : भाजपच्या 288 जागा निवडून येतील, अशी तयारी करा. आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जागा वाटप, युतीबद्दल देवेंद्रजी योग्य ते निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच इव्हीएममध्ये गैरव्यवहार तर मग बारामती कशी जिंकली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे असेल तर सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोंढा, एकनाथ खडसे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित आहेत. 

गेल्या पाच वर्षांत 50 हजार कोटीपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल, असे वर्तन माझ्या हातून होणार नाही. बुथ रचनेचे महत्वाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामुळेच 2014 जिंकलो. आता लोकसभा जिंकलो आणि विधानसभाही जिंकणार असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

इव्हीएममध्ये गैरव्यवहार तर मग बारामती कशी जिंकली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे असेल तर सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा असा टोलाही त्यांनी लगावला. वंचितमुळे काँग्रेसला फटका आणि भाजपला फायदा झाला, असे म्हणता येणार नाही. वंचितबिंचित काही नाही आपला विजय बूथ रचना आणि पन्ना प्रमुखांमुळे झाल्याचे ते म्हणाले. 

काँग्रेसचा बर्म्युडा झाला आहे, अशी बोचरी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. चंद्रकांत यांना भाजपमध्ये झेंडा मी हाती दिला आहे. या झेंड्यांचा मजबूत दांडाही दिला आहे. चंद्रकांत दादांचा अनुभव दांडगा आहे ते पक्ष आणखी वाढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना कामातून संधी देणारा पक्ष भाजप आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

तसेच सामान्य कार्यकर्त्यांना कामातून संधी देणारा पक्ष भाजप असून, गरिबांनी काँग्रेसला हटवला आणि गरिबांचा पंतप्रधान नेमल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Criticizes on Supriya Sule