लिंग बदलाच्या लढाईत एनओसीचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी बॅंकॉकला जाण्याच्या पासपोर्टवरील नाव बदलून मिळावे, यासाठी विमान प्राधिकरणाच्या 32 वर्षीय कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्राधिकरणाच्या ना हरकत दाखल्यासाठी (एनओसी) एअर ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजर असलेल्या स्वरूप बंदीकला याने केलेल्या याचिकेवर दोन जुलैला सुनावणी होणार आहे.

मुंबई - लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी बॅंकॉकला जाण्याच्या पासपोर्टवरील नाव बदलून मिळावे, यासाठी विमान प्राधिकरणाच्या 32 वर्षीय कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्राधिकरणाच्या ना हरकत दाखल्यासाठी (एनओसी) एअर ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजर असलेल्या स्वरूप बंदीकला याने केलेल्या याचिकेवर दोन जुलैला सुनावणी होणार आहे.

न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यापुढे स्वरूप बंदीकला याच्या याचिकेची सुनावणी झाली. स्वरूप हा पुरुष कर्मचारी म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरणात (एएआय) कार्यरत आहे. जोपर्यंत तो शस्त्रक्रिया करून महिला होत नाही, तोपर्यंत त्याचे नाव बदलण्यात येणार नसल्याचे प्राधिकरणातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत त्याची नाव बदलासाठी प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याची मागणी योग्यच असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.

स्वरूप हा आंध्र प्रदेशच्या तेनालीचा रहिवासी आहे. याचिकेत त्याने म्हटले आहे की, "पुरुष म्हणून जन्माला आलो असलो तरीही, लहानपणापासून आपल्या शरीरामध्ये स्त्री असल्याचा भास व्हायचा. 2010 मध्ये मुंबईत एएआयमध्ये कामाला सुरवात केली. 2016 मध्ये जेंडर डिसफोरियाबाबत माहिती कळल्यावर बॅंकॉकला जाऊन लिंग परिवर्तन सर्जरीचा निर्णय घेतला आहे.' याच काळात "स्वरूप बंदीकला'ऐवजी "मायरा ग्रेस बंदीकला' असा नावात बदल करूनही एएआय तो स्वीकारत नसल्याची त्याची तक्रार आहे.

यावर्षी सप्टेंबरमध्ये लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी स्वरूपला बॅंकॉकला जायचे आहे. त्यासाठी त्याला मायरा नावाने नवीन पासपोर्ट हवा आहे; मात्र अधिकृत कागदपत्रांमध्ये नावात बदल असल्याशिवाय आणि एआयआयच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय पासपोर्ट मिळणे कठीण आहे. पासपोर्टच मिळाला नाही, तर सर्जरी करणे शक्‍य होणार नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

बदली रद्द
कामाच्या ठिकाणी अन्य साथीदार धमकावतात. महिलांसाठीचे स्वच्छतागृह वापरण्यापासून रोखतात, अशी स्वरूप ऊर्फ मायराची तक्रार आहे. लिंग बदलासाठीचे उपचार सुरू असूनही आपली बदली शिर्डी विमानतळावर करण्यात आली; मात्र वरिष्ठांना उपचारांची माहिती दिल्यानंतर बदली रोखण्यात आल्याची माहिती याचिकेत दिली आहे.

Web Title: Change the gender NOC problem