विकासासाठी परिवर्तन हवंय...

निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मुलाखत देताना  महेश बालदी.
निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मुलाखत देताना महेश बालदी.

शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला. उरण शहर आणि तालुका, कर्नाळा किल्ला, जेएनपीटी बंदरातील व आंतरराष्ट्रीय विमानतळातील नोकऱ्या, चौक आणि मोहोपाडा भागातील पाण्याची समस्या आदी प्रश्‍नांवर बालदी यांनी प्रकाश टाकला. महेश बालदी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना बलाढ्य आव्हान उभे राहिले आहे; परंतु उरणमधील मतदारांना आपल्या रूपाने हवा असलेला बदल मिळेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्यक्त केला.

विकास कसा असेल? 
गेल्या पाच वर्षात झालेला विकास हा फार कमी आहे, म्हणून मी निवडणुकीला उभा आहे. रेल्वे आली असली, तरी ती एका टोकाला आली आहे. त्यामुळे उलवेपर्यंत रेल्वे पोहचवण्यासोबतच उरण आणि द्रोणागिरीपर्यंतचा विकास व्हायचा आहे. आधी नोड विकसित झाल्यानंतर रेल्वे आल्या. आता फक्त रेल्वेकडून तीन किलोमीटरचे भूसंपादन होणे बाकी आहे. आता केवळ रेल्वे मंत्री अथवा मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर बैठक घेतल्यास प्रश्‍न सुटेल व रेल्वे आल्यास या भागाचा कायापालट होईल.

दळणवळणाबाबत कोणत्‍या प्रभावी उपाययोजना करणार?
येथे शेकाप, शिवसेना व भाजप असे पक्ष लढत आहेत. विरोधकांनी काही केले असते तर केव्हाच प्रश्‍न सुटले असते. गेल्या विधानसभा निवडणुकीत १५ दिवस केलेल्या प्रचारामुळे ३३ हजार मते घेतली होती. त्यामुळे यंदा मी निवडून येईल, असा विश्‍वास आहे. माझ्या मतदारसंघाच्या एका टोकाला आजही रस्ता नाही. केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांसोबत वारंवार बैठका घेऊन अखेर घारापुरीसारख्या बेटावर वीज आली. या आमदारांनी एकदाही पाठपुरावा घेतला नाही. बोटसेवेच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मी घारापुरी विजेचा प्रश्‍न मांडला, तेव्हा ते करूयात बोलले. मुख्यमंत्र्यांनी भाषणात वीज सुरू होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर एमएसईबीचे संजीव कुमार यांची भेट घेतली. जागतिक निविदा काढून अंदाजे २२ कोटींचा खर्च आला. अखेर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उभा करून विजेचा प्रश्‍न सुटला.

बंदरांचा विकास कसा करणार?
ससून डॉकला मासेमारी होत असली तरी सर्वात जास्त उरण तालुक्‍यातून मच्छीमारी होते. येथे अडीच हजार ट्रॉलर्स आहेत. त्यांच्यासोबत मी आधीपासून काम करतो. काँग्रेसच्या काळात एका जेट्टीचे दगड आणि रेतीमुळे काम रखडलेले होते. त्याला ३० कोटींचा खर्च अपेक्षित होता. अखेर मच्छीमारांसोबत बैठक घेऊन कामाचा अंदाज काढला असता १५० कोटी रुपये खर्च आला. मात्र, अखेर नितीन गडकरी यांनी सागरमाला योजनेतून ७५ कोटी आणि राज्य सरकारकडून ७५ कोटी असा निधी उभारून बंदराचे काम सुरू झाले आहे. सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.

पाणी प्रश्‍न कधी सुटेल?
माझ्या मतदारसंघात १० वर्षांपासून देवळाली गावाजवळ आणि जांभिवली गावाजवळ अशी दोन जलसंपदा विभागाने तयार केलेली धरणे तयार आहेत. फक्त जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्या टाकल्या नसल्याने गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे. चावणे जलयोजनेतून ५० गावांची तहान भागली जाईल. रसायनी, खालापूर भागातील ग्रामीण भागात पाणी हवे आहे. गुळसुंदे गावात चक्क १८ दिवसांनी पाणी येते. शेजारी मोठी नदी वाहत असूनही ग्रामस्थांना पाणी नाही. 

शेतकरी हवालदिल
कर्नाळा बॅंकेकडे ४०० कोटी रुपयांचे देणे असून त्यात आज सर्वाधिक लोकांचे तसेच ग्रामपंचायतींचेही पैसे अडकले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून बॅंकेतून लोकांना पैसे मिळत नाही. उलवा नोड व गव्हाण नोडमधील शेतकऱ्यांनी जमिनींचे आलेले पैसे विश्‍वासाने या बॅंकेत ठेवलेले आहेत.  मात्र, लोकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्‍यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वहाळ ग्रामपंचायत व गव्हाण ग्रामपंचायतीचे दोन कोटी २३ लाख व पागोटे ग्रामपंचायतीचे सव्वा कोटी रुपये गेल्यात जमा आहेत. हे पैसे मिळत नसल्‍यामुळे संबंधित ग्रामपंचायतींचा विकास खुंटला आहे. आता ग्रामसेवकांनी पैसे का ठेवले, असे अनेक प्रश्‍न उद्‌भवणार आहेत. मात्र, त्‍याबाबत कायद्याने चाैकशी होईल. 

लोकांना बदल हवाय
गत निवडणुकीत १५ दिवस काम करून ३३ हजार मते घेतली होती; यंदा १८०० दिवस काम केल्यावर किमान एक लाख मतांची अपेक्षा मी करू शकतोच. मी केलेली कामे लोकांसाठी केलेली आहेत. लोकांना बदल हवा असल्याने आता माझा विजय सोपा आहे.  मच्छीमाराला हवी असलेली जेटी आणण्यासाठी आपण प्रयत्न केले असून येथील मतदार मला मतदान करेल. सुनील तटकरे ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री होते, तेव्हा का वीज प्रश्‍न सुटला नाही? शिवस्मारक कोणासाठी तयार केले आहे?, बंदर कोणासाठी तयार करीत आहे? या ठिकाणी सर्व स्थानिक व भूमिपुत्र व्यवसाय करणार आहेत. माझ्या विजयामुळे विरोधकांची राजकीय दुकाने बंद होतील, अशी भीती सध्या विरोधकांच्या मनात आहे.

कर्नाळा किल्ल्याचा विकास रखडला

कर्नाळा किल्ल्याचा विकास रखडला आहे. पूर्वीच्या आमदारांच्या काळात किल्ल्‍याकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे केवळ पायवाटाच शिल्‍लक राहिल्‍या आहेत. त्‍याठिकाणी पर्यटनाच्या दृष्‍टीने कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाही. हॉटेल किंवा पर्यटकांना बसण्याची व्यवस्था नसल्‍यामुळे या पर्यटनस्‍थळाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे; मात्र आता आम्‍ही विकासाकरीता साडे अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्‍यामुळे किल्ल्‍याचा कायापालट होणार आहे.

साडेबारा टक्‍के योजना निकालात काढली
साडेबारा टक्‍के योजनेचा वापर फक्‍त स्‍वतःच्या राजकारणासाठी शेकापने केलेला आहे. इच्छाशक्तीचा अभाव, पाठपुरावा नाही, पत नाही; त्यामुळे शेकापला विकासाचे काम कधीच जमले नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रिया मंत्री नितीन गडकरींच्या मार्गदर्शनानुसार उरण तालुक्‍यातील शेतकऱ्यांना इरादापत्रांचे वाटप करून साडेबारा टक्के योजना निकालात काढली. मात्र, घरगुती वादांमुळे हे इरादापत्रांचे वाटप रखडले; परंतु ४० वर्षांनंतर शेतकऱ्यांना त्यांचे भूखंड मिळणार आहेत.

केवळ तीन इंचाच्या जलवाहिनीवर वळली मते
पूर्वी शेकापवर विश्‍वास ठेवणारी अनेक गावे होती. त्‍यामुळे एकानेही मतदान न केल्‍यास काही फरक पडत नव्हता. कारण तीन इंचाच्या जलवाहिनीच्या मंजुरीवर शेकापने संपूर्ण गावांची मते लाटली होती. जी कामे साध्या कनिष्‍ठ अभियंत्‍यामार्फत सुटत होती, अशा विकासकामांचे शेकापने राजकारण केले. 

दीड लाख नोकऱ्या मिळणार
मतदारसंघातील लोकांकडून पाणी व रोजगार या दोन मागण्या प्रामुख्याने आमच्याकडे केल्या जातात. एसईझेड व बंदराशी संबंधित करारात स्थानिकांना रोजगार देण्याचे बंधनकारक केले असून त्यातून सुमारे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पहिले प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना दिल्यानंतर स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. पोर्ट आणि एअरपोर्टच्या माध्यमातून अगदी सेवा चतुर्थ श्रेणी ते पहिल्या श्रेणीतील नोकऱ्या स्थानिकांना उपलब्ध करून देणार आहोत. जेएनपीटी व सिडकोच्या माध्यमातून नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहेत. तीन हजार कोटी रुपये खर्च करून आठ पदरी रस्ता तयार केला जात आहे. पावसाळा, उपरस्ता, रेल्वेच्या परवानग्या, अतिक्रमणे, जमीन अधिग्रहण हे प्रश्‍न असल्याने उरणला जाणारा रस्ता रखडला. परंतु, कामाचा वेग पाहता पुढील एका वर्षात उरणला जाण्यासाठी अवघा अर्धा तास लागेल. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही आता पूर्ण होईल.

आणखी एक ट्रॉमासेंटर सुरू करणार
उरणमधील इंदिरा गांधी रुग्णालयाचा कायापालट होईल. जेएनपीटीतर्फे एक ट्रॉमा सेंटर सुरू झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णांना हवी असलेली मदत मिळावी, असे एक रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस आहे. उरण मार्गाजवळ रुग्णालय उभारले जाण्याची शक्‍यता आहे.

नागरिकांसाठी लवकरच टाऊन हॉल सेवेत
टाऊन हॉलच्या विकासासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. नगरपरिषदेच्या बॅंक खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. पर्यावरण परवानगीसाठी काही वेळेची प्रतीक्षा लागली. मात्र, विविध मंजुरी प्राप्त झाल्यामुळे टाऊन हॉलचा विकास लवकरच होणार आहे.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com