अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पात्रता नियमात बदल; रिक्त जागा भरण्यासाठी सरकारचा निर्णय

तेजस वाघमारे | Saturday, 10 October 2020

अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट पाच टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सीईटी परीक्षेत किमान एक गुण आणि बारावीला किमान 45 टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे.

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट पाच टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सीईटी परीक्षेत किमान एक गुण आणि बारावीला किमान 45 टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त जागांची संख्या दरवर्षी वाढत चालली असल्याने यावर तोडगा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेशाच्या पात्रतेमध्ये हा बदल केला असल्याचे सांगितले जात आहे. 

लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नयेत; भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अभियांत्रिकी प्रवेशाला विद्यार्थ्यांची मोठी मागणी होती. त्यामुळे संस्थाचालकांनी नवीन शैक्षणिक संस्था खुल्या केल्या; परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून अभियांत्रिकी पदवीनंतरही नोकरी मिळत नसल्याने या अभ्यासक्रमाकडील विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. जागा शिल्लक राहत असल्याने संस्थाचालकांनी महाविद्यालयांच्या तुकड्या, शाखा कमी केल्या. यामुळे गेल्या सहा वर्षांत सुमारे 20 टक्‍क्‍यांनी जागा घटल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी महाविद्यालये चालविणे कठीण झाल्याने संस्थाचालकांकडून प्रवेश नियमांमध्ये बदल करण्याची मागणी होत होती. त्यानुसार अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी असलेल्या पात्रता नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

भिवंडीत किरकोळ वादातून अँसिड हल्ला; पाच जण जखमी; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

 प्रवेशाबाबतचे राजपत्र जारी 
अभियांत्रिकी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबतचे राजपत्र राज्य सरकारने जारी केले आहे. यापूर्वी अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या गुणांची अट ही 50 टक्के होती; तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किमान गुणांची अट ही 45 टक्के इतकी होती. सरकारच्या निर्णयानुसार अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान 45 टक्के गुण, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. 
------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)