
Double Decker Bus : डबल डेकर बसमध्ये काय बदल?
फ्रंट सीटमध्ये बदल
बेस्टच्या वातानुकुलित इलेक्ट्रिक व्हेईकल डबल डेकर बसमध्ये सुरूवातीला असणाऱ्या दोन्ही सीटचा समावेश नव्हता. परंतु या सीटसोबत मुंबईकरांच्या प्रवासाच्या अनेक आठवणी असल्यानेच या सीटची मागणी प्रोटोटाईप मॉडेलनंतर करण्यात आली. त्यामुळेच आज ताफ्यात दाखल झालेल्या डबल डेकर बसमध्ये चार पैकी तीन बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बदलांमध्ये एक हक्काची अशी फ्रंट सीट मुंबईकरांना गमवावी लागली आहे.
दोन दरवाजे, एक कंडक्टर
बेस्टच्या याआधीच्या डबल डेकर मॉडेलला एकच प्रवेश अन् एकच बाहेर पडण्याचा मार्ग होता. नव्या डबल डेकरमध्ये मात्र दोन ठिकाणाहून प्रवेश किंवा बाहेर पडता येईल. पुढून चढणाऱ्या प्रवाशांसाठी वरच्या मजल्यावर प्रवेश देण्यात येईल. त्यावेळी तुमचा कपाळमोक्ष होणार नाही, याचीही काळजी प्रवाशांनाच घ्यावी लागणार आहे.
सध्या तात्पुरत्या स्पंचचा मुलामा या प्रवेशाच्या ठिकाणी देण्यात आला आहे. परंतु या वरच्या मजल्यावर प्रवेश करणाऱ्यांसाठी डिजिटल पर्यायाचा वापर करणे सक्तीचे असेल. कारण या वरच्या डेकवर कंडक्टर असणार नाही. त्यामुळे प्रवासाच्या वेळी कार्ड टॅप इन करून प्रवास संपल्यावर टॅप आऊट करूनच प्रवास करण्याची सुविधा असेल. त्यामुळे पहिल्या मजल्यावरील बेस्टचा कंडक्टर कर्मचारी याठिकाणी सेवेत नसेल. एनसीएमसी कार्ड वापरावर बेस्ट भर देणार आहे.
एमर्जन्सी एक्झिट अडगळीतील
बेस्टच्या डबल डेकर बसला पुढील बाजुने चढण्याचा आणि उतरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु त्याचवेळी अतिशय कमी उंचीच्या जागेतून प्रवाशांना वरच्या मजल्यावर जावे लागणार आहे. शिवाय एमर्जन्सी एक्झिटही शिडीच्या शेजारी अडगळीच्या जागेत आहे. तर शिडीला लागूनच पहिल्या स्थानावर बसणाऱ्या व्यक्तीसाठी पाय ठेवण्यासाठीची जागा अतिशय मर्यादा आहे.
साचलेल्या पाण्यातूनही मार्ग काढणार
बेस्टच्या वातानुकुलित इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस या लो फ्लोअर पद्धतीने डिझाईन करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी बसेससाठीची इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरीचीही व्यवस्था चोख करण्यात आली आहे. मुंबईत पाणी साचणाऱ्या भागात या बसेसच्या बॅटरीची व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. वॉटर प्रुफ अशा पद्धतीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्यातूनही मार्ग काढणाऱ्या या बसेस ठरतील, असा विश्वास बेस्टच्या अधिकाऱ्यांचा आहे. तसेच स्पीड ब्रेकरच्या अनुषंगानेही या बसेसच्या रचनेवर कोणताही परिणाम नसेल.
अप्पर डेकला उभा राहून प्रवास नाहीच
बेस्टच्या सध्याच्या अनेक मार्गांवर डबल डेकरमध्ये एकाचवेळी १०० हून अधिक प्रवासी प्रवास करतात. परंतु नव्या डबल डेकर बसमध्ये फक्त ६५ प्रवाशांना प्रवास करण्याची क्षमतचा आहे. त्यामुळेच लोअर डेकला प्रवाशांना उभे राहून प्रवासी मुभा असली तरीही वरच्या डेकला मात्र उभा राहून प्रवास करता येणार नाही.