चारोटी बाग पर्यटकांसाठी खुली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कासा ः डहाणू तालुक्‍यातील चारोटी नाका येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून चारोटी बाग उभारण्यात आली आहे.

कासा ः डहाणू तालुक्‍यातील चारोटी नाका येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून चारोटी बाग उभारण्यात आली; मात्र अनेक वर्षांपासून उद्‌घाटनाअभावी बंद असलेल्या या बागेचे मंगळवारी (ता.१२) कासा ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ गायकवाड, चारोटी ग्रामपंचायत सरपंच महादेव तांडेल यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. आजपासून ही बाग पर्यटकांना खुली असल्याचे कासा वनपरिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल एस. एस. पाटील यांनी जाहीर केले.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यातील चारोटी गाव हे मुंबई येथील खासदार पूनम महाजन यांनी दत्तक घेतले आहे. त्यामुळे गावातील पाणी, वीज, रस्ते याबाबतीत सुधारणा केली जात आहे. त्याचप्रमाणे चारोटी नाका येथील महामार्गाशेजारी असलेली वन विभागाची पडीक तीन एकर जागा आदर्श खासदार ग्राम योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनस्थळासाठी वापरण्यात आली. मोठा निधी वापरून बाग तयार करण्यात आली. यामध्ये अनेक वारली पेंटिंग, झोपडी, खेळणी, व्यायामासाठी साधने, फूलझाडे लावण्यात आली आहेत.

चारोटी येथून सुमारे २५ किलोमीटरपर्यंत निसर्ग पर्यटन बाग नसल्याने अनेक पर्यटक डहाणू, वापी, सेल्वास येथे जातात. सुट्टीमध्ये लहान मुलांना करमणुकीचे साधन नसल्याने ही बाग नक्कीच पर्यटनाच्या दृष्टीने अपयुक्त ठरणार आहे; मात्र अनेक वर्षांपासून ती बंद होती. अखेर आज ती सर्वांसाठी खुली झाल्याने पर्यटक, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या बागेची देखभाल करण्यासाठी संयुक्त व्यवस्था समिती स्थापन झाली आहे. 

डहाणू तालुक्यातील चारोटी येथे निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून उभारलेल्या बागेचे उद्‌घाटन अनेक वर्षांपासून बाकी होते. ते आज डहाणू वन विभागातर्फे करण्यात आले. आजपासून ही बाग सर्व पर्यटकांना खुली आहे. यासाठी वनविभाग कासा आणि संयुक्त समिती नियोजन करून काही शुल्क पर्यटकांकडून घेऊन या पैशांतून बागेची निगा राखली जाईल. पर्यटकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.
एस. एस. पाटील, वनक्षेत्रपाल, कासा, वन विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charoti gardens open to tourists in Kasa near Palghar