भंगारातून आणले होते दुर्घटनाग्रस्त विमान 

शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - घाटकोपर परिसरात कोसळलेले "सी 90' जातीचे विमान गेल्या चार वर्षांपासून जुहू परिसरात केवळ उभे होते. चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतलेले हे विमान कंटेनर वाहनातून रस्त्याने मुंबईत आणले गेले होते. 

मुंबई - घाटकोपर परिसरात कोसळलेले "सी 90' जातीचे विमान गेल्या चार वर्षांपासून जुहू परिसरात केवळ उभे होते. चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतलेले हे विमान कंटेनर वाहनातून रस्त्याने मुंबईत आणले गेले होते. 

"भंगाराच्या किमतीत विकत घेतलेले हे विमान 30 सेकंदांवर असलेल्या विमानतळावर पोचू शकले नाही यावरून विमानाची स्थिती लक्षात घ्या,' असे "डीजीसीए'शी संबंधित एका उच्च पदस्थाने "सकाळ'ला सांगितले. अशोक कोठारी समूहाकडे या विमानाची मालकी होती. निवडणुकांच्या काळात विमानांची मागणी वाढते. काही उद्योग समूह नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी माफक दरात प्रचारासाठी विमान उपलब्ध करून देतात. आज कित्येक वर्षांनंतर तांत्रिक चाचणीसाठी विमानाला सज्ज करणे हा निवडणुकांकडे डोळा घेऊन घेतलेला निर्णय असावा, अशी शंका व्यक्‍त करण्यात येते आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी यूव्ही कंपनीने उत्तर प्रदेश सरकारकडून दुर्घटनेचे कारण ठरलेले हेलिकॉप्टर तसेच एक विमान विकत घेतले होते. ते उडण्यायोग्य नसल्याने कंटेनरमध्ये टाकून रस्त्याने मुंबईपर्यंत आणले गेले, अशी आठवण संबंधित सांगतात. धूळ खात पडलेले हे विमान केवळ काही महिन्यांवर आलेल्या लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज केले जात असावे, असा कयास आहे. 23 वर्षे जुनी ही तबकडी उडती करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता. मात्र मुंबईतील बेभरवशाच्या पावसाळी वातावरणात असे जुने विमान उडवण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्‍नही केला जातो आहे. हवाई वाहतूक नियमानुसार अभियंते विमान उडण्यास योग्य आहे काय याची चाचणी घेतात, त्यानंतर ते वैमानिकांच्या हवाली केले जाते. गेल्या काही वर्षांत हवाई वाहतुकीला उधाण आले असल्याने तांत्रिकदृष्ट्या अत्युत्कृष्ट नसलेल्या विमानांनाही उडण्याची परवानगी दिली जाते की काय, असा प्रश्‍न केला जातो आहे. 20 वर्षांनंतर विमानाला उड्डाणाची परवानगी नसते, तरीही हे विमान उडवले कसे गेले, असा प्रश्‍न आहे. निवडणुकीच्या काळात काही कंपन्या नेत्यांच्या दिमतीला तासागणिक 30 ते 40 हजारांपर्यंतचे नाममात्र शुल्क आकारून विमाने भाड्याने देतात आणि त्या काळात झालेल्या सलगीचा वापर करीत कामे मार्गी लावतात, असे या कॉर्पोरेट क्षेत्रात खुलेआम बोलले जाते. नेत्यांनाही अशा सेवा मिळवण्याची सवय झाली आहे. काही बड्या कंपन्या विमाने वापरासाठी द्यावी लागू नयेत यासाठी ती थेट दुबईत ठेवतात. वापरासाठी तेथून ती भारतात आणण्याचा खर्च नेत्यांच्या मागणीपेक्षा कमी असतो, असे गमतीने म्हटले जाते. 

मुख्यमंत्र्यांनाही सेवा, दोनदा अपघात 
आज दुर्घटनाग्रस्त झालेल्या या कंपनीच्या विमानाची सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पुरवली गेली आहे. सरकारी यंत्रणेने या कंपनीच्या सेवेचा वापर केला आहे. गडचिरोली येथे झालेल्या विमानाच्या छोट्याशा अपघातातून फडणवीस बचावले तेव्हा याच कंपनीचे विमान होते, तर अलिबाग येथे विमान उतरल्यावर दरवाजे बंद न होण्याच्या घटनेतून मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे बचावले तेव्हाही याच कंपनीने सेवा पुरवल्या होत्या, असे समजते. या दोन्ही घटनांची चौकशी करून सेवा खंडित केल्या काय, या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकाराला आशीर्वाद कुणाचे, असा प्रश्‍न केला जातो आहे. 

Web Title: Chartered Plane Crashes In Ghatkopar Mumbai