बेशिस्त रिक्षाचालकांना लगाम

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई; ७ महिन्यांत १२ लाखांचा दंड वसूल

पनवेल  : मीटरप्रमाणे रिक्षा न चालवणे, मनमानी भाडे आकारणे, गणवेश न वापरणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून प्रवास करणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे असे प्रकार पनवेल परिसरातील रिक्षाचालकांकडून सर्रासपणे केले जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाचालकांविरोधात वाढत्या तक्रारींची दखल घेऊन सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे रिक्षाचालकांना लगाम लावला आहे.

वाहतूक पोलिसांनी मागील जानेवारी ते ऑगस्ट महिन्यात ५१९ रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली असून, ११ लाख ८६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वारंवार सांगूनही रिक्षाचालकांचा उद्धटपणा कमी होत नसल्याने रिक्षाचालकांविरोधात अनेक प्रवासी तक्रारी करीत आहेत. अशा रिक्षाचालकांविरोधात आक्रमकपणे कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. वाहतूक विभागाने कळंबोली, कामोठे, खारघर व पनवेल; तसेच तळोजा परिसरात जानेवारी ते ऑगस्ट या ७ महिन्यांत ५१९ रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली असून मागील वर्षी एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या ९ महिन्यांच्या कालावधीत ६९३ रिक्षाचालकांना १६ लाख ६७ हजार ९३१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 ई-चलनचा धसका 
महामार्गावर रिक्षा चालवताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी ई-चलन प्रणालीचा चांगलाच धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अतिरिक्त प्रवासी दिसताच वाहतूक विभागाचे कर्मचारी ई-चलन करत असल्याने आर्थिक नुकसानीच्या भीतीने महामार्गावर रिक्षा चालवताना जादा प्रवासी भरण्याचे प्रकार काही अंशी कमी झाले आहेत. त्‍यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्‍त करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To the chaste rickshaw driver