ओएलएक्‍सवरून फसवणूक करणारे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई - ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘ओएलएक्‍स’ संकेतस्थळावरून महागड्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीच्या नावाने ग्राहकांना लुबाडणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अय्याज सय्यद आणि आरिफ सय्यद अशी त्यांची नावे असून महागड्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीखाली ते अनेकांची फसवणूक करत असल्याचे बीकेसी पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आले आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्याची आलिशान कारही त्यांनी अशा प्रकारे विकल्याचे उघड झाले आहे.

दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांकडून आठ महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. एप्रिलमध्ये बीकेसी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास सहायक आयुक्त अरुण माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कल्पना गाडेकर, पोलिस निरीक्षक प्रदीप खानविलकर, उपनिरीक्षक अमित उत्तेकर, नवनाथ काळे, गणेश तोडकर आदींच्या पथकाने सुरू केला.

पोलिसांनी तपास करून शुक्रवारी (ता. १८) मोहम्मदला अटक केली. त्याला न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या चौकशीत आरिफचे नाव समोर आले. पोलिसांनी रविवारी (ता. २०) आरिफला अटक केली. त्याला न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
ई पोर्टलवर खरेदी-विक्री करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. फसवणूक होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी, असे पोलिस उपायुक्त (परिमंडळ ८) अनिल कुंभारे यांनी सांगितले. 

आरिफ वाहने दुरुस्तीच्या व्यवसायात होता. झटपट श्रीमंत होण्याकरता त्या दोघांनी कट रचला. गाड्यांच्या व्यवहारादरम्यान विश्‍वास वाटावा म्हणून मोहम्मद बनावट आधार कार्ड द्यायचा.

अशी करायचे फसवणूक
‘ओएलएक्‍स’वर गाड्यांच्या विक्रीकरता जाहिराती टाकणाऱ्यांशी मोहम्मद संपर्क करायचा आणि त्यांना हॉटेलमध्ये भेटून त्यांच्या गाड्यांची खरी कागदपत्रे ताब्यात घ्यायचा. खरेदी-विक्रीचा व्यवहार धनादेश किंवा ऑनलाईन करावा, असे पर्याय देऊन मोहम्मद बाहेर जायचा. त्यानंतर मोबाईलमध्ये एडिट केलेला मेसेज विक्री करणाऱ्यांना दाखवायचा. ऑनलाईन पेमेंटकरता दोन तास लागतील, असे सांगून विक्री करणाऱ्यांसोबत काही वेळ घालवायचा. त्यानंतर टेस्ट ड्राइव्हच्या नावाखाली गाडी घेऊन पळून जायचा. ‘ओएलएक्‍स’वरील चोरलेल्या ग्राहकाची गाडी विक्रीकरता तो मग आरिफकडे आणून देत असे. मग आरिफ ती गाडी पुन्हा दुसऱ्यांना विकायचा.  कधी कधी गाडी विक्रीच्या नावाखाली मोहम्मद जाहिरातही करायचा. टोकन देऊन रक्कम घेऊन आरोपी पळून जायचे.

Web Title: Cheater arrest crime OLX