पतंजलीचे वितरक नेमण्याच्या प्रलोभनातून गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मुंब्रा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

ठाणे : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेड या कंपनीचे वितरक देण्याच्या नावाखाली अज्ञात भामट्यांनी दिवा येथे राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीला 3 लाख 46 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील 48 वर्षीय तक्रारदार दिवा पश्‍चिम येथे राहतात. त्यांचा घरगुती वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, तक्रारदार यांना 13 जानेवारी 2019 रोजी एक फोन कॉल आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने "मी पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड कंपनीकडून बोलतोय,' असे सांगितले.

"आम्ही आपणास पतंजली कंपनीचे वितरण हक्क, परवाना, लॅपटॉप, बारकोड मशीन आणि उत्पादन देणार आहोत,' असे फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. तसेच याबाबतची विविध पत्रे तक्रारदार यांना पतंजली बिजनेस डॉट ओआरजी या नावाच्या साईटवरून इमेल केली. 

वारंवार येणारे फोन कॉल्स आणि इमेलमुळे तक्रारदार यांचा विश्वास बसला व त्यांनी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार 3 लाख 46 हजार 707 इतकी रक्कम एनईएफटीद्वारे ट्रान्स्फर केली; मात्र पैसे पाठवूनदेखील तक्रारदार यांना कुठल्याही प्रकारचे वितरण हक्क अथवा उत्पादन देण्यात आले नाही.

त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी मुंब्रा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मुंब्रा पोलिसांनी या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating in appoint Patanjali distributor