देवदर्शनासाठी आला अन्‌ जाळ्यात अडकला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

मुंबई - बनावट पावती बनवून नातेवाइकाला 87 कोटींच्या गैरव्यवहारासाठी मदत करणाऱ्या दुबईतील 41 वर्षीय व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) हैदराबाद येथून अटक केली. आरोपी व्यावसायिकाविरोधात दोन वर्षांपूर्वी लूक आऊट सर्क्‍युलर (एलओसी) जारी करण्यात आले होते. डीआरआयला तो चकवा देत होता; मात्र तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी हैदराबाद येथे आलेला हा व्यावसायिक जाळ्यात अडकला.

शुभम सचदेवा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची दुबईमध्ये "ईएससीओआरपी कमोडिटीज' नावाची कंपनी आहे. सचदेवा सिंगापूरहून हैदराबाद विमानतळावर उतरला होता. तेव्हा एलओसीच्या मदतीने स्थानिक यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर डीआरआयने त्याला अटक केली. सचदेवा याने मुंबईतील त्याचा नातेवाईक नमित सोनी याच्या नामको इंडस्ट्रीज या कंपनीला चढ्या भावाने पावती दिली होती. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनी याच्या कंपनीने स्वीडनहून 15 कोटींची मशिन आयात केली होती. ही मशिन सचदेवाच्या कंपनीकडून खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. त्यासाठी सचदेवा याने 102 कोटींची पावती दिली होती.

त्याआधारे सोनीने कंपनी तोट्यात असल्याचे दाखवले. अशा प्रकारे आरोपींनी संगनमत करून 87 कोटींची मनी लॉंडरिंग केल्याचा आरोप आहे.

Web Title: cheating crime businessman arrested