नव्या नोटा पाहण्यासाठी मागून घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा उठवत भामट्यांनी सर्वसामान्यांना लुबाडण्यास सुरुवात केली आहे. नव्या नोटा कशा दिसतात, हे पाहण्यासाठी मागून घेऊन हातचलाखीने एका नोकरदाराचे 18 हजार रुपये हातोहात लांबवल्याची घटना सांताक्रूझ येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

महिनाभरापूर्वी केंद्र सरकारने 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. नव्या नोटा कमी प्रमाणात असल्याने बॅंका आणि एटीएमसमोर रांगा लागत आहेत. मंगळवारी (ता. 6) एक नोकरदार व्यक्ती सांताक्रूझ पश्‍चिम येथील एका खासगी बॅंकेत पैसे काढण्याकरता गेली. बॅंकेने त्यांना दोन हजारच्या नव्या 25 नोटा दिल्या. ही व्यक्ती पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती तिथे आली. तिने नव्या नोटा कशा दिसतात हे पाहायचे आहे, अशी बतावणी करत 25 नोटा आपल्या हातात घेतल्या आणि त्यातील नऊ नोटा नकळत काढून घेत त्याने सुंबाल्या केला. घरी आल्यावर नऊ नोटा कमी असल्याचे लक्षात येताच सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बॅंकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

अंधेरीत ऑनलाइन गंडा
केंद्र सरकारने फसवणूक रोखण्याकरिता जनजागृती मोहीम हाती घेतली; तरीही फसवणुकीच्या घटना सर्रास घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना अंधेरीत घडली. आपल्या बॅंकेतून बोलतोय, तुमची माहिती हवी आहे, असे सांगणारा कॉल एका खातेदाराला आला. त्याने तपशील सांगितला. पासवर्ड मिळताच त्याच्या खात्यातून पाच हजार रुपये काढून घेतले गेले. या फसवणुकीप्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: cheating in mumbai