‘रोमान्स स्कॅम’मधून दीड कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

पत्नीचे सर्व दागिने विकल्यानंतर घरही विकणार होता वृद्ध

मुंबई : समाजमाध्यमावर ओळख झालेल्या ४१ वर्षांच्या महिलेने ७९ वर्षांच्या वृद्धाला दीड कोटींचा गंडा घातल्याचा ‘रोमान्स स्कॅम’ समोर आला आहे. पत्नीचे सर्व दागिने विकल्यानंतर हा ज्येष्ठ नागरिक घरही विकण्यासाठी निघाला होता; परंतु हा प्रकार त्याच्या मुलाच्या लक्षात आल्यामुळे घर वाचले.

फसवणूक झालेला ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक एका प्रसिद्ध कंपनीत अभियंता होता. मे महिन्यात समाजमाध्यमावर त्याची ओळख विवियन लवेट (४१) या स्पॅनिश महिलेशी झाली. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला दोन मुलांचा सांभाळ करत असल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. मैत्री झाल्यानंतर हे दोघे व्हॉट्‌सअॅपवरून एकमेकांच्या संपर्कात होते.

जूनमध्ये या महिलेने आपण लॅपटॉप, मोबाईल व दागिने पाठवत असल्याचे त्याला सांगितले; परंतु या ज्येष्ठ नागरिकाने ते स्वीकारण्यास नकार दिला. या वस्तू मुंबईतील अनाथाश्रमांना देता येतील, असे तिने सुचवले. भेटवस्तूंमध्ये परदेशी चलन असल्यामुळे ५० हजार रुपये सीमा शुल्क भरण्याची सूचना तिने केली. 

लवेटकडे मोठ्या प्रमाणात परदेशी चलन सापडल्यामुळे तिला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तिची सुटका करण्यासाठी या वृद्धाकडून अनेक वेळा पैसे उकळण्यात आले. त्यासाठी त्याने पत्नीचे दागिने विकले आणि आणखी रक्कम हवी असल्यामुळे घर विकण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतून मुलगा भारतात आल्‍यानंतर त्याने वडिलांचा मोबाईल तपासला असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुलाने मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

भामट्यांची कार्यपद्धती
समाजमाध्यम अथवा विवाहविषयक संकेतस्थळांवर बनावट प्रोफाईल तयार केले जाते. ओळख झाल्यानंतर भेटवस्तू पाठवली जाते. त्यात मौल्यवान वस्तू, दागिने असल्याचे सांगितले जाते. ही भेटवस्तू अडकल्याचा बनाव रचून संबंधिताकडून पैसे उकळले जातात. एकाकी ज्येष्ठ नागरिक, विधवा व घटस्फोटित महिलांना लक्ष्य केले जाते. कधी कधी प्रेमातही पाडून फसवणूक केली जाते. नायजेरियन भामट्यांची मक्तेदारी असलेल्या या प्रकारांत आता देशातील टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating through romance scam