लालबागच्या जुन्या पुलाची पाहणी करा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

मुंबई - लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या दृष्टीने पाहणी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

मुंबई - लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या दृष्टीने पाहणी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

या पुलाच्या दुरुस्तीबाबत सामाजिक कार्यकर्ते भगवान रय्यानी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पुलाची दुरुस्ती करण्याआधी त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, कारण तो जुना असला, तरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे रय्यानी यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या एफ दक्षिण आणि ई विभागातून जाणाऱ्या या पुलाची दुरुस्ती स्ट्रक्‍चरल ऑडिट न करता करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिट न करता दुरुस्तीवर खर्च केला तर तो वाया जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठानेही त्यांच्या दाव्याला सहमती दर्शविली.

पालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुलाची पाहणी करून स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे का ते पाहावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. पाहणी केल्यानंतर स्ट्रक्‍चरल ऑडिटची आवश्‍यकता नसल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला, तर पालिका आयुक्तांनी त्यानुसार कार्यवाही करावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. याचिकेवर आता ९ जानेवारीला सुनावणी होईल.

Web Title: Check old bridge near Lalbaug