नाल्यांमध्ये पुन्हा रासायनिक सांडपाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

तुर्भे - नवी मुंबईतील नाल्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचा प्रश्‍न हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर ते बंद झाले होते. परंतु आता एमआयडीसीतील कंपन्या पुन्हा या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडत असल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कंपन्यांवर अंकुश ठेवण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील घणसोली, महापे, पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्‍वास घेण्यास त्रास होणे, नाकाला झिणझिण्या येणे, मळमळणे, डोळे चुरचुरणे असा त्रास नागरिकांना आणि विशेषतः लहान मुले व वृद्धांना होत आहे. रासायनिक द्रव्याच्या उग्र वासामुळे कर्करोगासारखा दुर्धर आजाराची शक्‍यता असल्याने  नगरसेवक, सामाजिक संस्था व मंडळांनी आवाज उठवला होता. 

लाल, काळे पाणी
सध्या घणसोली, महापे, पावणे येथील नाल्यांमध्ये दोन दिवसांपासून काळे व लाल रासायनिक द्रव्य पुन्हा सोडले जात आहे. त्याचा परिणाम सजीवांबरोबरच झाडांवरही होत आहे. त्यामुळे हा प्रकार कायमचाच बंद करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. याबाबत पर्यावरण समितीच्या सभापती दिव्या गायकवाड यांना विचारले असता आपण पुन्हा या प्रकाराची पाहणी करून अधिकाऱ्यांना जाब विचारू, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Chemical sewage in the drains