वसईतील नाले, गटारांमध्ये विषारी द्रव्य

वसई ः नाल्यामधून वाहणारे विषारी रासायनिक द्रव्य.
वसई ः नाल्यामधून वाहणारे विषारी रासायनिक द्रव्य.

वसई ः बोईसरमध्ये औद्यौगिक वसाहतीत प्रदूषणाचा विळखा पसरला असताना आता वसई तालुक्‍यात ही घरघर पसरू नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने काही कंपन्यांचे विभाग बंद करण्याची कारवाई केली आहे. अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र त्यानंतरही रासायनिक विषारी द्रव्याचा पूर वाढत असून नाले, गटारातून रासायनिक द्रव्य थेट खाडीत जाऊन प्रदूषण निर्माण होत आहे. यामुळे मासे आणि मानवी वस्तीला धोका निर्माण होण्याची भीती आहे. 

वसई पूर्व भागात अनेक छोटे-मोठे उद्योग वसले आहेत. त्या ठिकाणी साडी कारखाने, रासायनिक पदार्थ, विविध रंग वापरून काम केले जात आहे. रासायनिक द्रव्य ज्या कारखान्यात वापरले जाते त्या ठिकाणी विषारी वायू पसरू नये, म्हणून प्लांट लावले जातात, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आदेश देण्यात येतात; परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी नाल्यात विषारी रासायनिक द्रव्य जात असून मानवी; तसेच वन्यजीवाला, शेतीला ते घातक ठरत आहे. 

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील महामार्गावर काही महिन्यांपूर्वी रासायनिक पदार्थाशी संपर्क आल्याने 7 गाईंचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावरून हे द्रव्य किती घातक असेल, याची कल्पना येऊ शकते. औद्योगिक आणि मानवी अशी संमिश्र वसाहत वसई तालुक्‍यात आहे. याचा परिणाम नागरिकांवरदेखील होत आहे. 

रस्त्यांवर जर कारखान्यातून कचरा टाकला जात असेल, तर त्यावर वारंवार कारवाई केली जाते; मात्र केमिकलयुक्त पाणी जर नाल्यात, गटारात सोडले जात असेल, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कारवाईचे अधिकार आहेत. 
मनोहर केदार, आरोग्य विभाग, महापालिका 

विनापरवाना कंपन्या असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. प्रदूषण होऊ नये आणि केमिकल प्रक्रिया करण्यासाठी प्लांट बसवण्याचे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी याबाबत कारखानदार गांभीर्याने पाहत नाहीत, ते युनिट बंद केले आहेत. तसेच अनेकांना या महिन्यातदेखील नोटिसा बजावल्या आहेत; तर प्रक्रिया करून नंतर केमिकलयुक्त पाणी सोडण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली जाते. 
अमर दुर्गुले, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com