छोटा राजनविरुद्धच्या मुंबईतील गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - सीबीआयच्या कोठडीत असलेल्या कुख्यात गुंड छोटा राजनविरुद्ध मुंबईत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा तपास सीबीआय करणार आहे. तशी विनंती राज्य सरकारनेच सीबीआयला केली होती.

मुंबई - सीबीआयच्या कोठडीत असलेल्या कुख्यात गुंड छोटा राजनविरुद्ध मुंबईत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा तपास सीबीआय करणार आहे. तशी विनंती राज्य सरकारनेच सीबीआयला केली होती.

छोटा राजनविरोधात मुंबईतील निर्मलनगर, नवघर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1999 मध्ये एका व्यावसायिकाला 25 लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी राजनविरोधात निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या टोळीतील रोहित, जॉन, अशोक या गुंडांविरोधातही मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजनविरुद्ध दुसरा गुन्हा टिळकनगर पोलिस ठाण्यात सप्टेंबर 1998 मध्ये शस्त्रास्त्र कायद्याखाली दाखल करण्यात आला होता. बाला कोटियन हा गुंड त्याच्या मित्रासह नवग्रह हॉटेलमध्ये बसला असताना दोन अनोळखी गुन्हेगारांनी त्याच्यावर गोळीबार करून पळ काढला होता. या हल्ल्यात बालाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाला होता. राजनवरील तिसरा गुन्हा 2004 मध्ये नवघर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. तोही शस्त्रास्त्र कायद्याखाली. त्याच्या टोळीतील आरोपी 31 जुलै 2004 ला तक्रारदाराच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली होती.

राजनच्या अटकेची पार्श्‍वभूमी
इंटरपोलने राजनच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर त्याला ऑक्‍टोबर 2015 मध्ये सीबीआयने इंडोनेशियातील बाली बेटावर अटक केली. राजनचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न केले होते. मात्र सीबीआयने त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता.

Web Title: Chhota Rajan in Mumbai against the CBI to investigate crimes