मुख्यमंत्र्यांकडून ठाणे नगरीचे असेही कौतुक

ठाणे : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील स्मारक उभे राहायला अजून वेळ असला तरी, बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा पहिला मान ठाणे नगरीने मिळविला आहे, असे गौरवोद्‌गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात काढले.

ठाण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. ठाणे महापालिकेमार्फत राबवण्यात येत असलेल्या क्‍लस्टर या महत्त्वाकांक्षी योजनेचा मुहूर्त तसेच इतर प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत समाधान व्यक्त केले. 

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीनहात नाका येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाचा दिमाखदार उद्‌घाटन सोहळा पार पडला. बाळासाहेबांच्या या स्मारकात बाळासाहेबांच्या दुर्मिळ चित्रांचा समावेश असून बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेसाठी ही एकप्रकारे पर्वणीच ठरणार आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्याच्या दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी या स्मारकाचे उद्‌घाटन केले. मुंबईतील स्मारकाला अद्याप मूर्त स्वरूप आले नसले तरी, ठाण्याने हा बहुमान मिळवल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. तसेच, या स्मारकासाठी 33 कोटी 91 लाखांचा खर्च झाल्याची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलताना दिली. 

"माझे ठाणे खणखणीत नाणे' हे बाळासाहबांचे उद्‌गार चितारून त्याखालीच 2012 साली बाळासाहेबांनी ठाण्यातील सभेत ज्या खुर्चीत बसून लाखोंच्या जनसमुदायासमोर भाषण केले होते, ती खुर्ची या स्मारकात जतन करून ठेवण्यात आली आहे. विलोभनीय अशी विद्युत रोषणाई केल्याने रात्रीच्या अंधारात देखील स्मारकाचा रुबाब प्रेक्षणीय बनला आहे. 

असे आहे बाळासाहेबांचे स्मारक 

  • ठाण्यातील तीनहात नाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले आहे. 
  • याठिकाणी ऍम्पी थिएटर, प्रदर्शन हॉल आदींसह विविध वास्तु या एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. 
  • स्मारकाची इमारत पिरॅमिड आकाराची असून तळ अधिक तीन मजल्यांची ही ऍनेक्‍स इमारत असणार आहे. 
  • इमारतीच्या आवारातच बाळासाहेबांचे 42 फुटी स्मारक उभारले जाणार असून 30 हजार चौरस फुटांवर ही पिरॅमिड वास्तू उभारली जाणार आहे. 
  • ठाण्यासह मुंबई व जिल्ह्यातील नव्या जुन्या कलावंतांसाठी या स्मारकाच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 
  • भव्य प्रदर्शन हॉल तसेच व्यंगचित्र गॅलरीत बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा समावेश आहे. 
  • आर्ट गॅलरी आणि व्यंगचित्र गॅलरीच्या निमित्ताने बाळासाहेबांचा संपूर्ण जीवनपट आणि इतिहास साकारला आहे. 
  • स्मारकातील साऊंड लाईट स्टुडिओमध्ये बाळासाहेबांच्या दुर्मीळ ठरलेल्या भाषणांच्या ध्वनिफिती ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 
  • कलाकारांना आपल्यातील कलागुण सादर करण्यासाठी तसेच, कला विषयक कार्यशाळा घेण्यासाठी जागादेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
  • दूरवरून येणाऱ्या कलाकारांची राहण्याची व्यवस्था या स्मारकामध्ये असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मेडिटेशन आणि योग अभ्यासासाठी दालन असणार आहे. 
  • स्मारकस्थळी कॅफेटरिया, लॉन, मैदान, दोन ऍम्पी थिएटर, संदर्भ ग्रंथालय अशा अनेक सुविधा या एकाच छताखाली उपलब्ध केल्या आहेत. 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com