
मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह राजशिष्टाचार विभाग, महापालिका, पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या दृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. मुंबई महापालिकेच्या वतीने दादर येथे २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला ३० एप्रिल २०२२ रोजी एक तप पूर्ण झाले आहे. २८०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज ठाकरेंची अनुपस्थिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज हुतात्मा स्मारक आदरांजली कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. दरवर्षी ते न विसरता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अदारांजली वाहतात. या वेळी मात्र त्यांची औरंगाबाद येथे सभा असल्याने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येऊ शकले नाहीत. राज यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले.
Web Title: Chief Minister Greets The Martyrs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..