मुख्यमंत्र्यांनी दाखविला नवी मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला.

खारघर : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला.

या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी आदी मान्यवर उपस्थित होते. 

बेलापूर-पेंधर मार्गावर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोची चाचणी डिसेंबर-जानेवारी महिन्यात होणार असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत नवी मुंबईकरांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. मेट्रोच्या आवश्‍यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तळोजा कारशेड ते पेंधरदरम्यान धावणाऱ्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

मुख्यमंत्री यावेळी मेट्रो डब्यात आसनस्थ झाले होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2018 मध्ये सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्ती गृह निर्माण योजनेत यशस्वी झालेल्या दहा हजार अर्जदारांना वाटपपत्राचे ऑनलाईन प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी सिडको कर्मचाऱ्यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून धनादेश सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमास सिडकोचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister shows green flag to Navi Mumbai Metro