मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश 'आमीर'च्या आड लपवू नये - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

ठाणे - सरकारचे अधिकारी जर आमीर खानच्या प्रकल्पांवर काम करीत असतील, तर जनतेने सरकारला मतदानासाठी रांगेत उभे राहून निवडून का आणावे? आजपर्यंत एखाद्या संस्थेसाठी सरकार काम करतेय, हे कधी ऐकले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अपयश आमीर खानच्या आड लपवू नये, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

आमीर खानच्या "पाणी फाउंडेशन'च्या माध्यमातून राज्यात दुष्काळग्रस्त भागात समाजकार्य सुरू आहे. या फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमास आजी-माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. मी मंचावर येण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आमीर खानने चांगले काम केल्याचे एका सहकाऱ्याला सांगत होते. जर, आमीरने चांगले काम केले, तर या दोन्ही सरकारने इतक्‍या वर्षांमध्ये काय केले? "पाणी फाउंडेशन'च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे म्हणजेच सरकारने आपला पराभव मान्य केल्यासारखेच आहे. कारण जे लोकसहभागातून घडले ते यांना घडवता आले नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

नागरिकांनी मतदान का करावे?
जर आमीर खानला आपल्या कार्याचा अहवाल जनतेसमोर मांडता येऊ शकतो, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा अहवाल मांडणे का शक्‍य होत नाही? पाच वर्षांत सरकारला जलसंधारणासाठी मिळालेले 40 हजार कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले? लोकसहभागातूनच सरकारी कार्य घडत असेल, तर निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावून का मतदान करावे? असा प्रश्‍नांचा भडिमारही राज यांनी सरकारवर केला.

Web Title: Chief Minister Unsuccess Aamir Khan Raj Thackeray Politics