शिवसेना उपशाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - कुरार व्हिलेज (मालाड) परिसरातील शिवसेनेच्या शाखा क्रमांक 39चे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची आज रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आपल्या घराकडे दुचाकीवरून जात असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी सावंत यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सावंत यांना चार गोळ्या लागल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कुरार पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सावंत यांना तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचीदेखील अशाच प्रकारे हत्या झाली होती. तर, केडगाव (जि. नगर) येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता मुंबईत माजी उपशाखाप्रमुखाची हत्या झाली आहे.

सचिन सावंत यांच्या हत्येचे कारण समजू शकलेले नाही.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून मारेकऱ्यांची ओळख पटविण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. अशाप्रकारे शिवसेना उपशाखाप्रमुखाची हत्या झाल्याने परिसरात तणावाचे व दहशतीचे वातावरण आहे.

Web Title: Chief of Shivsena subdivision sachin sawant murder