चिमुकला पार्थ लढतोय दुर्धर आजाराशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

मुंबई : अवघ्या आठ महिन्यांचा गोंडस पार्थ मस्ती करतो, गोड हसतो, आपल्या बोलण्याला प्रतिसादही देतो... मात्र तो एका जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अडकला आहे. यकृत प्रत्यारोपण झाले तरच पार्थचे जीवावरील संकट टळणार आहे. मुलाच्या जन्मानंतर बाललीलांमध्ये रमलेल्या पार्थच्या आई-वडिलांना आता त्याच्या शुश्रूषेसाठी धावपळ करावी लागत आहे. यकृत प्रत्यारोपणासाठी तब्बल 35 लाख एवढा मोठा खर्च असून, त्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. पोटच्या गोळ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी समाजातील दानशुरांची त्यांना गरज आहे.

पार्थला यकृताचा "बायलरी एट्रेशिया' असा जीवघेणा आजार आहे, हे समजल्यावर राजवाडे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पार्थच्या जन्मानंतर काहीच महिन्यांनी त्याच्या शीवाटे रक्त पडायला लागले. दूध पचत नव्हते. दूध प्यायल्यानंतर शी आणि त्यानंतर पुन्हा भुकेने रडणारे पार्थ, अशी परिस्थिती होती. डॉक्‍टरांनी केलेल्या तपासण्यांमध्ये पार्थच्या यकृताला सूज आल्याचे लक्षात आले. त्यानंतर तो अडीच महिन्यांचा असताना त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. पाच तास झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला दिलासा मिळेल, अशी आशा फोल ठरली. शेवटी डॉक्‍टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला, असे पार्थची आई प्राची राजवाडे यांनी सांगितले. पार्थचे नाव चेन्नईच्या अवयव प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीत नोंदविण्यात आले. पार्थ उपचार घेतो त्या रुग्णालयातील लहान मुलांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया चेन्नईत होत असल्याने पार्थच्या नावाची तिथे नोंदणी करण्यात आल्याचे प्राची यांनी सांगितले.

एका खासगी कंपनीत इंटिरेअर डिझायनर असलेल्या प्राचीची नोकरी बाळ झाल्यानंतर सुटली. पार्थचे वडील योगेश राजवाडे एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. पार्थच्या उपचारांमध्ये आजवर कमावलेले बरेचसे पैसे खर्च झाले. पार्थसाठी सुरू केलेला सपोर्ट ग्रुप, सोशल माध्यम आणि इतर ठिकाणांहून सुमारे 17 लाख रुपये जमविण्यात राजवाडे कुटुंबीयांना यश आले. पार्थच्या उपचारांसाठी केलेल्या आवाहनातून काही लाख उभे राहिले आहेत. आजही आर्थिक मदत मिळावी म्हणून प्राची आणि योगेश अनेक संस्था व व्यक्तींची भेट घेत आहेत.

डॉक्‍टरांना वेळीच कळले असते तर?
पार्थच्या आजाराचे निदान वेळीच झाले असते तर इतक्‍या लवकर त्याला प्रत्यारोपणाची गरज पडली नसती. काही ठिकाणी रिपोर्ट चुकीचे आले. काही ठिकाणी निदान करायला उशीर झाला, असेही पार्थ राजवाडे यांनी सांगितले.

आईला इतरांना मदत करायचीय
पार्थचा आजार आणि त्यातून अनुभवलेले दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्राची यांनी असा आजार झालेल्या इतर मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थच्या शस्त्रक्रियेनंतर त्या त्यासाठी जमेल तसा वेळ देणार आहेत.

अशी करू शकता मदत
संपर्क ः parthlivertransplant.blogspot.com
अकाऊंट नाव ः पार्थ योगेश राजवाडे
अकाऊंट क्रमांक ः 06171040000124683
आयएफएससी कोड ः IBKL0000617
एमआयसीआर क्रमांक ः 400259054

Web Title: child struggling for life, needs help for lever transplant