मुलांचे मैदानाविनाच ‘खेळ’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुलांना मैदान नसल्याने पर्यायी जागा शोधून त्या ठिकाणी पालिकेकडून मैदान बनवण्याची गरज आहे. डेव्हलपमेंट कधी होईल आणि मुलांना सुविधा कधी मिळतील हाच मोठा प्रश्न आहे. 
- जॉन सांगळे, स्थानिक नगरसेवक

दादर - लहान मुले, महिला, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये उद्याने व मैदानांची व्यवस्थाच नसल्याने गैरसोय होत आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदानांअभावी रस्त्यावरच उतरावे लागत आहे. त्यामुळे मुले गल्ली, इमारतीच्या आवारातच क्रिकेट, बॅडमिंटन यांसारखे मैदानी खेळ खेळताना दिसत आहेत.

ज्येष्ठ नागरिक व महिलांना तर फेरफटका मारण्यास, तसेच निवांत बसण्यास एखादे उद्यानही नाही. निवडणुका जवळ आल्या की समस्यांवर आश्‍वासने देण्याचे सोपस्कारच सर्वपक्षीय उमेदवार पूर्ण करतात; पण निवडणुका संपल्या की त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. लेबर कॅम्पमध्ये मोकळी जागाच सोडली नसल्याने ही समस्या भेडसावत आहे. माहीम येथील शाहू नगरच्या मैदानामध्ये नेहमी जाणे येथील मुले व रहिवाशांना शक्‍य नाही; शिवाय या एकाच मैदानात किती मुलं खेळणार हाही महत्त्वाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे महापालिकेकडून शिवाजी पार्क व डब्ल्यू आयटी गार्डन ही मैदाने सुचवण्यात आली पण ही दोन्ही मैदाने एक ते दीड किमीवर असल्याने मुलांना, तसेच विभागातील रहिवाशांना दररोज या ठिकाणी जाणे शक्‍य नाही. त्यामुळे तूर्तास लेबर कॅम्पमधील मुलांना मैदानासाठी वाट पाहावी लागणार आहे.

रहिवाशांच्या मैदानाबाबत तक्रारी आल्या, तर आम्ही धारावी डेव्हलपमेंट विभागाकडे तशा मागणीचे प्रस्ताव पाठवू, शिवाजी पार्क, डब्ल्यू आयटी गार्डन हे पर्यायही तेथील मुलांकडे आहेत. 
- रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त, जी-उत्तर विभाग

Web Title: Children game with out ground