कळव्यात मुलांच्या खेळण्यावर संक्रांत 

कळवा : गावदेवी मैदानात अस्ताव्यस्त पडलेले मंडपाचे साहित्य व कचरा.
कळवा : गावदेवी मैदानात अस्ताव्यस्त पडलेले मंडपाचे साहित्य व कचरा.

कळवा : दिवाळी संपून आठवडा उलटत आला तरी कळवा बाजारपेठ परिसरातील गावदेवी मैदानावर फटाके दुकानदारांनी केलेला केरकचरा महापालिकेच्या स्वच्छता विभागाने उचललेला नाही. त्यामुळे ऐन दिवाळी सुट्टीत या मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या बच्चेकंपनीचा हिरमोड झाला आहे. हा कचरा त्वरित साफ करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. 

कळवा बाजारपेठ परिसरातील नागरिकांकरिता "गावदेवी मैदान' हे एकमेव छोटेखानी मैदान आहे. या मैदानावर नवरात्र, सार्वजनिक गणेशोत्सव, कळवा फेस्टिव्हल व इतर सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर होत असतात. इतर वेळी सुट्टीच्या दिवशी, दिवाळी व मे महिन्यात या परिसरातील मुले येथे खेळत असतात. गेल्या काही वर्षांपासून महापालिका बाजारपेठेमध्ये वाहतुकीला अडचण होऊ नये, तसेच पर्यावरण सुरक्षा म्हणून या मैदानावर दिवाळीच्या सणापर्यंत फटाके दुकानासाठी परवानगी देते. 

दिवाळीनंतर लगेचच दुकानदारांच्या मदतीने सफाई कामगारांनी तेथे साचलेला केरकचरा व मंडपाचे साहित्य हटविण्याचे आदेश असतात. मात्र, दिवाळी संपून आठवडा होत आला तरी अजूनही या मैदानावरील केरकचरा, फाटलेल्या ताडपत्री, बांबू, हटवलेला नसल्याने ऐन सुट्टीत मुलांची खेळण्याची पंचाईत झाली आहे. त्यामुळे या मैदानावरील कचरा व साहित्य त्वरीत हटविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

सध्या शाळांना सुट्टी असल्याने आमच्या मुलांना खेळण्यासाठी एकमेव गावदेवी मैदानाचा आधार आहे. मात्र, या मैदानात दिवाळीनिमित्त फटाकेविक्रीची दुकाने थाटल्याने त्यांचा कचरा अद्याप तसाच आहे. त्यामुळे मुलांची मोठी गैरसोय होत आहे. हा कचरा संबंधितांनी त्वरित साफ करावा. 
- हिराबाई कांबळे, पालक 

मैदानावर साचलेला केरकचरा, ताडपत्री उचलण्याचे काम सुरू आहे. उद्या बांबूही उचलले जातील व हे मैदान बच्चेकंपनीला खेळण्यासाठी मोकळे केले जाईल. 
- संजीव रणदिवे, 
स्वछता निरीक्षक, 
कळवा प्रभाग समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com