मूल होत नसल्याच्या नैराश्‍येतून मुलाची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून दोन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला अवघ्या 24 तासांच्या आत गजाआड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. पार्वतीदेवी रामछबिला विश्‍वकर्मा असे अटकेत घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मूल होत नसल्याच्या नैराश्‍येतून हे कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे. 

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून दोन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला अवघ्या 24 तासांच्या आत गजाआड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. पार्वतीदेवी रामछबिला विश्‍वकर्मा असे अटकेत घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मूल होत नसल्याच्या नैराश्‍येतून हे कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे. 

पार्वती ही मूळची बिहारची रहिवासी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती नालासोपारा येथे वास्तव्यास आहे. 20 वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले; मात्र मूल होत नसल्याने तिला पतीसह सासरच्या मंडळींकडून याबाबत वारंवार त्रास देण्यात येत होता. रविवारीही (ता. 4) पार्वतीदेवी आणि तिच्या पतीमध्ये याच कारणावरून खटके उडाले. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या पार्वतीदेवीने सायंकाळी घराबाहेर पडत इतरांचे मूल चोरण्याचा निर्णय घेतला. सीएसएमटी येथे प्रचंड गर्दी असल्याने तेथे सहज मूल चोरता येईल या उद्देशाने ती येथे आली. 

सीएसएमटी स्थानकाच्या प्रतीक्षागृहात विमल अनिल सातदिवे या आपला मुलगा सनीसोबत पतीची वाट पाहत बसल्या होत्या. त्यांना डोळा लागल्याचा फायदा घेत पार्वतीदेवीने दोन वर्षांच्या सनीचे अपहरण केले. पार्वतीदेवी तेथून टॅक्‍सीने चर्चगेटला गेली. तेथून लोकल पकडून ती नालासोपारा येथे आपल्या घरी आली. 

विमलला जाग आल्यानंतर मुलगा सनी शेजारी नसल्याचे निदर्शनास येताच तिने याबाबत सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक हेमंत बावधनकर, उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्ये, पोलिस शिपाई प्रभाकर साबळे, सुनील यादव, कैलास पवार, रूपाली आकडे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसी टीव्हीची पाहणी केली. तेव्हा एक महिला नालासोपारा पूर्व येथे मूल घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी नालासोपारा येथील तब्बल 600 रिक्षाचालकांची चौकशी केली. चौकशीदरम्यान रिक्षाचालक मनोज श्रीवास्तवने पार्वतीदेवीला तुळींज परिसरात सोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक तुळींज गावात गेले. तेथील 500 घरांत विचारपूस केल्यानंतर पोलिस पार्वतीदेवीपर्यंत पोहचले. पोलिसांनी पार्वतीकडून अपहरण झालेल्या सनीची सुटका केली. तिला बुधवारी (ता. 7) न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

मुलाला गावी नेण्याचा कट फसला 
सीएसएमटी येथून सनीचे अपहरण केल्यानंतर पार्वतीदेवी नालासोपाराला आली. कोणाला संशय येऊ नये म्हणून ती सनीला बिहारला नेण्याच्या विचारात होती. जर शेजारच्यांनी मुलाबाबत विचारल्यास ते मूल आपल्याला संस्थेने दत्तक दिल्याचा पार्वतीदेवी कांगावा करणार होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. 
 

Web Title: Childs theft in mumbai CST