मिरचीचा ठसका झाला कमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

वाशीतील मसाला बाजारात लाल मिरचीची आवक वाढल्याने दर निम्म्यांवर आले आहेत...

नवी मुंबई - यंदा मिरचीचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. वाशीतील मसाला बाजारात लाल मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने दरही निम्म्यांवर आले आहेत. मिरचीच्या दराचा ठसका कमी झाल्याने अनेकींनी अधिक मसाला बनवण्यावर भर दिला आहे.

मसाला बनवण्यासाठी गुंटूर, पाण्डी, लवंगी, शंकेश्‍वरी, काश्‍मिरिया मिरच्या लागतात. कोल्हापूर, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून या मिरच्यांची आवक होते. आठवड्याला ३० हजार पोती मिरचीची आवक घाऊक बाजारात होत आहे. 

मागील वर्षी मसाल्याची मिरची १५० ते १७० रुपये किलोपर्यंत गेली होती. ती आज ५० ते ८० रुपये किलो झाली आहे. पाण्डी मिरची ७५ ते ८० रुपये किलो, लवंगी १०० ते ११०, शंकेश्‍वरी ११० ते १२०, बेडगी मिरची १५९ ते १६०, काश्‍मिरी मिरची १५० ते १७० रुपये किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दर निम्म्याने खाली आले आहेत, अशी माहिती मिरचीचे व्यापारी डी. व्ही. एस. शहा यांनी दिली.

अख्खा गरम मसाला स्थिर
मसाला बनवण्यासाठी अख्खा गरम मसालाही लागतो. त्यात सध्या दालचिनी १७५ रुपये किलो आहे. चक्रीफूल १९९, लवंग ६६०, काळी मिरी ५६०, नागकेसर ८००, जवादी १३००, रामपत्री ६३०, मोठी वेलची १८००, त्रिफळा १८०, जायफळ ६६०, जिरे १७०, तेजपान ७०, कसुरी मेथी १७०, शहाजीरे ५३० रुपये किलो आहेत. त्यांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

Web Title: chili rate in washi market