‘चायना कोथिंबिरी’ची चलती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

यंदा अतिपावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी कोथिंबिरीचे पीक वाहून गेले; तर काही ठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. परिणामी, बाजारात सध्या जास्त काळ टिकणारी हायब्रीड (चायना कोथिंबीर) दिसू लागली आहे.

वाशी -  यंदा अतिपावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी कोथिंबिरीचे पीक वाहून गेले; तर काही ठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. त्यामुळे बाजारात सध्या कोथिंबिरीची आवक कमी झाली आहे. परिणामी, बाजारात सध्या जास्त काळ टिकणारी हायब्रीड (चायना कोथिंबीर) दिसू लागली आहे. या कोथिंबिरीचे नाव ‘चायना कोथिंबीर’ असले तरी ही कोथिंबीर आपल्याकडेच पिकवली जाते. केवळ तिचे गुणधर्म ‘चायनामेड’सारखे असल्याने तिला ‘चायना कोथिंबीर’ म्हणून ओळखले जात आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक व पुणे येथून मोठ्या प्रमाणात देशी कोथिंबीर येते. देशी कोथिंबीर चवीला उत्तम असून, तिचा सुगंधही येतो; मात्र सध्या अतिपावसामुळे कोथिंबिरीचे नुकसान झाल्याने कोथिंबिरीची आवक घटली आहे. नेहमी ५० ते ६० गाड्यांची होणारी आवक सध्या ३० ते ४० गाड्यांवर आली आहे. मागणी इतका पुरवठा होत नसल्याने बाजारात असलेल्या कोथिंबिर महागली आहे. घाऊक बाजारात ६० ते ७० रुपयांना मिळणारी १ किलोची जुडी ही बाजारात १२० ते १६० रुपयांने विकली जात आहे.  कोथिंबिरीची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आता नाशिक, पुणे, गुजरात, कर्नाटकमधून हायब्रिड कोथिंबीर मागविण्यास सुरुवात केली आहे. ही कोथिंबीर ८० ते १०० रुपये किलोने मिळत आहे. किरकोळ बाजारात हीच कोथिंबीर ३० ते ३५ टक्के जास्त दराने मिळत आहे. या कोथिंबिरीची पाने आकाराने मोठी असून, ती पावसात जास्त वेळ टिकते. त्यामुळे व्यापारी ही कोथिंबीर मागवत आहेत; ही कोथिंबीर चवीला फारशी चांगली नसून, तिला सुगंध नाही. सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा हॉटेल व्यावसायिकांकडून तिला अधिक मागणी असते. मागील वर्षी चायना कोथिंबीर ही ४० ते ६० रुपये किलो होती; तर देशी कोथिंबीर ६० ते ९० रुपये किलोपर्यंत होती.

अतिपावसामुळे देशी कोथिंबिरीचे नुकसान झाल्याने व्यापारी आता चायना कोथिंबीर मागवत आहेत. तिचे दर देशी कोथिंबिरीपेक्षा कमी आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत देशी कोंथिबीर बाजारात दाखल होईल.
- महेश गुप्ता, व्यापारी

बाजारात देशी कोथिंबिरीची जुडी महाग झाल्यामुळे नाइलाजास्तव हायब्रिड कोथिंबीर घ्यावी लागत आहे; पण या कोथिंबिरीला ना सुंगध, ना चव असते. 
- अर्चना काशिद, गृहिणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China coriader in Market