नवी मुंबईत चायनीज सेंटरचे पेव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मुंबई ः नवी मुंबई शहरातील अनेक मोकळ्या जागा अनधिकृत चायनीज सेंटरने व्यापल्या आहेत. या ठिकाणी उघड्यावर मद्यपानालाही मुभा दिली जात असल्याने रात्री उशिरापर्यंत तळीरामांच्या पार्ट्या रंगतात. त्या‌मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असून, या चायनीज सेंटरकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

मुंबई ः नवी मुंबई शहरातील अनेक मोकळ्या जागा अनधिकृत चायनीज सेंटरने व्यापल्या आहेत. या ठिकाणी उघड्यावर मद्यपानालाही मुभा दिली जात असल्याने रात्री उशिरापर्यंत तळीरामांच्या पार्ट्या रंगतात. त्या‌मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असून, या चायनीज सेंटरकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

काही महिन्यात शहरात अनधिकृत चायनीज सेंटरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध सुविधांसाठी राखीव असलेले मोकळे भूखंड, वन्यजमिनी तसेच इतर आडोशाच्या जागी हे चायनीज सेंटर चालवले जात आहेत. सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक नोडमध्ये असे चायनीज सेंटर पाहायला मिळत आहेत. त्यापैकी कोपरखैरणे, घणसोली, दिवाळे, नेरूळ तसेच सारसोळे परिसरात सर्वाधिक चायनीज सेंटर असल्याचे समोर आले आहे. त्या ठिकाणी सर्रासपणे उघड्यावर मद्यपानाला मुभा दिली जात असून, काही चायनीज सेंटरमध्ये तर ग्राहकांसाठी मद्यही उपलब्ध करून दिले जाते. यामुळे चायनीज सेंटरवर तळीरामांची गर्दी वाढत आहे. त्यांच्यासाठी रात्री उशिरापर्यंत हे चायनीज सेंटर सुरू ठेवले जातात. 

या चायनीज सेंटरवर उपलब्ध होणारे अन्नपदार्थ नाल्यालगत अथवा झाडीत शिजवले जातात. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. यानंतरही पोलिस, उत्पादन शुल्क यासह संबंधित सर्वच प्रशासनांचे त्यावर कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. चायनीज सेंटर चालकांना मिळणाऱ्या मुभेमुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात अन्न औषध प्रशासचे साह्यक आयुक्त शिवाजी देसाई यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

चायनीज सेंटरवर रात्री उशिरापर्यंत मद्यपान चालत असल्याने परिसराची शांतता भंग होत असून, कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.
-विनय लोखंडे, नागरिक, ऐरोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Center's move to Navi Mumbai