राजकीय पक्षांना मराठीची आस्था नाही : चिन्मयी सुमीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

मुंबई : राजकीय पक्षांसाठी मराठी हा मुद्दा आहे. त्यांना मराठीबद्दल आस्था नाही, अशी खंत मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी येथे व्यक्त केले. 

मुंबई : राजकीय पक्षांसाठी मराठी हा मुद्दा आहे. त्यांना मराठीबद्दल आस्था नाही, अशी खंत मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी येथे व्यक्त केले. 

मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिरच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव उन्नतनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, माझे वडील सनदी अधिकारी होते. तर आई मानसोपचार तज्ज्ञ. त्यांनी मला मराठी शाळेत शिकवले. त्याप्रमाणे मीही माझ्या मुलाला मराठी शाळेत टाकले. प्रयोगशील मराठी शाळा वाढल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी शिक्षकांची व शाळांची आहे, असे मत सुमीत यांनी व्यक्त केले. मराठी भाषा, मराठी शाळा टिकविण्याची जबाबदारी सरकार, मराठीप्रेमी संस्था, व्यक्ती यांच्याबरोबरच पालकांचीही आहे. आपल्या पाल्याला मराठी शाळेत घालण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांनी शेजारील कुटुंबातील पालकांचे मनही त्यांच्या पाल्याला मराठी शाळेत घालण्याकडे वळवले, तर हे या महासंमेलनाचे खरे यश आहे, असेही चिन्मयी यांनी सांगितले. 

मराठी शाळांनी क्रीडा प्रकार आणि स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे. इंग्रजी शाळा याच घटकांना प्राधान्य देत असतात, असेही त्या म्हणाल्या. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या पालकांची क्षमता ओळखून त्यांच्या अनुभवाचे आदानप्रदान विद्यार्थ्यांसोबत करता येईल का? याचाही विचार झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 
 

Web Title: Chinmayee Sumit says about Political parties