चिंतामणीच्‍या आगमन सोहळ्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

चिंतामणीच्‍या आगमन सोहळ्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या वर्षी गणपतीच्या आगमन सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतून कोणताही धडा घेतलेला नाही. यंदाही भक्तांनी हुल्लडबाजी करत गिरणगावातील रस्त्यांवरील दुभाजकांची नासधूस केली. त्याचबरोबर ५६ मोबाईल लंपास झाले असून पाचजण चेंगराचेंगरीमुळे गुदमरली आहेत. त्यातील दोन तरुणींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिस्तबद्ध उत्सवांचा इतिहास असलेल्या गिरणगावात ही हुल्लडबाजी डोळ्यांनी दिसत असताना प्रशासकीय यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्ताने हजारो भक्तांची गर्दी जमली. हे भक्त पनवेल, वसई, विरार आदी लांबच्या परिसरातून आले होते. सुमारे ६० हजारांपेक्षा जास्त भक्त जमल्याचा अंदाज आहे. लालबाग उड्डाण पुलाच्या खालील दुभाजकावरील सुशोभीकरणासाठी लावलेली रोपे या वेळी तुडवली गेली. 

यंदाही चेंगराचेंगरीचा फटका खास करून तरुणींना बसला. चेंगराचेंगरीमुळे पाच भक्त गुदमरले. त्यातील सायली लोहार आणि श्‍वेता घाडीगावकर या दोघींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार कोणतेही नुकसान झाले नाही. 

तर, महानगरपालिकेला या नुकसानीची माहितीच नाही. अद्याप याबाबत माहिती आलेली नाही. माहिती घेऊन पुढील कारवाई करू, असे एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी सांगितले.

स्वयंसेवक आणि पोलिसांचेही ऐकले नाही 
भक्तांची हुल्लडबाजी सुरू असताना अनेक ठिकाणी त्यांना पोलिस आणि स्वयंसेवकांकडून अटकाव केला जात होता. दुभाजकावर चढलेल्या भक्तांना पोलिस वारंवार खाली उतरण्यास सांगत होते. मात्र, भक्त कोणालाच दाद देत नव्हते.

तो मार्ग नव्हताच 
ज्या ठिकाणी नुकसान झाल्याचा दावा केला जातोय, तो मिरवणुकीचा मार्गच नव्हता. मग, हे नुकसान मिरवणुकीमुळे झाले असे कसे म्हणता येईल; असा दावा गणेशोत्सव समन्वय समितीचे गिरीश वालावलकर यांनी केला. तर, यंदा वाहतुकीचे तसेच मिरवणुकीचे नियोजन योग्य पद्धतीने झाले होते. मंडळ प्रसिद्ध झाल्यानंतर भक्तांची गर्दी होते, असा आतापर्यंतचा अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com