नाटकाच्या पसंतीनंतरच स्वेच्छामूल्य स्वीकारणार 

नाटकाच्या पसंतीनंतरच स्वेच्छामूल्य स्वीकारणार 

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि "अनामिक' यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित "हे मृत्युंजय' हे नाटक रंगमंचावर येणार आहे. नाटकाचा प्रयोग पसंत पडला, तरच रसिकांनी स्वेच्छेने दिलेले तिकिटाचे पैसे स्वीकारले जाणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाद्वारे नाट्यक्षेत्रातील हा अनोखा प्रयोग राबवला जाणार आहे 

"हे मृत्युंजय' नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात 26 ऑक्‍टोबर 2018 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या नाटकाचे सर्वच प्रयोग खुले असून, नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक त्यांच्या इच्छेनुसार स्वेच्छामूल्य देऊ शकतात, असे सावरकर स्मारकाने जाहीर केले आहे. पैशांचा विचार न करता सर्वांनी प्रयोगाच्या ठिकाणी यावे. इच्छा असेल तरच नाटकाच्या पुढील प्रयोगांसाठी स्वेच्छामूल्य द्यावे; पण नाटक अनुभवावे. स्वातंत्र्यवीरांचे विचार घेऊन देशासाठी कार्य करावे, ही त्यामागची भावना असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले. 

नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे, तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे. देवदत्त बाजी यांचे पार्श्‍वसंगीत आहे. प्रकाश योजनेची बाजू शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. अजिंक्‍य ननावरे, संदीप सोमण, जयेंद्र मोरे, सुयश पुरोहित, शार्दुल आपटे, बिपीन सुर्वे, नितीन वाघ, विशाख म्हामणकर, केतन पाडळकर, योगेश दळवी, मधुसूदन सोनावणे हे कलाकार या नाटकात भूमिका करणार आहेत. 

राष्ट्रविचार नागरिकांपर्यंत  पोहचवण्याचा प्रयत्न 
स्वातंत्र्यवीर सावरकर हे कुणा एका व्यक्ती अथवा संस्थेचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. राष्ट्राच्या बळकटीसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. छळ सहन केला. तरीही दृढनिश्‍चयापासून ते ढळले नाहीत. त्यामुळेच त्यांचे विचार हे राष्ट्राचे विचार आहेत. ते नागरिकांपर्यंत पोहचावेत, ही या नाटकामागची तळमळ आहे, अशी भूमिका स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्पष्ट केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com