सिडको खारघर टेकडींवर हेवन हिल्स साकारणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन

सिडको खारघर टेकडींवर हेवन हिल्स साकारणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन


नवी मुंबई : शहरातील विकासापासून बचावलेल्या एकमेव खारघर टेकडींवर सिडको हेवन हिल्स नावाचा निवासी प्रकल्प राबवणार आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते पोलिसांच्या राखीव घरांची नोंदणी, व्हर्च्युअल निवारा केंद्रांसोबत हेवन हिल्स प्रकल्पाचेही ऑनलाईन उद् घाटन करण्यात आले. 

खारघर येथे निसर्गाच्या सानिध्यात सिडकोतर्फे हेवन हिल्स प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याचबरोबर या टेकडीवर आणखीन काही वृक्षलागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. टेकडींवरील सुमारे 250 एकर जागेवरील प्रकल्पात निवासी व्हिला, नेचरो थेरपी आणि रिसॉर्ट तयार केले जाणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या वर्दळीपासून दूर असणाऱ्या डोंगरावरील शांत, सुंदर आणि निसर्गाने नटलेल्या जागेत निर्माण केल्या जाणाऱ्या हेवन हिल्स प्रकल्पाचे ध्वनिचित्रफीतद्वारे सिडकोने उद्धव ठाकरेंना सादरीकरण केले. त्याचप्रमाणे ठाकरे यांच्या हस्ते पोलिसांच्या घरांच्या नोंदणीचे शुभारंभही करण्यात आला. त्यासोबतच या आधीच्या गृहप्रकल्पातील यशस्वी 3 हजार 670 ग्राहकांना घरांचे ऑनलाईन वाटप केले. 

हिल्स स्टेशनमध्ये पडणार भर
ब्रिटिशांच्या काळात अनेक हिल्स स्टेशन राज्यात साकारली गेली. परंतु निसर्गाचा समतोल राखून सिडकोच्या माध्यमातून खारघर टेकडींवर साकारण्यात येणारे हिल्स स्टेशन महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे. अशा शब्दांत ठाकरे यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.

निसर्ग संपन्न टेकडींचा विकास
पनवेल आणि नवी मुंबई शहराच्या अगदी मधोमध खारघर शहराच्या कडेला या डोंगररांगा आहेत. वन विभागाच्या जमिनींना लागून खारघर टेकडी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या जडणघडणीनंतरही या टेकडीचा विकास झाला नव्हता. त्यामुळे ही टेकडी आजही निसर्ग संपन्न राहिली आहे. टेकडीवर दोन आदिवासी गावे आहेत. डोंगरावर जाण्यासाठी रस्ताही तयार करण्यात आला आहे. या टेकडी शेजारी राहणारे नागरिक टेकडीवरील रस्ता सकाळी चालण्यासाठी वापरतात. त्यानंतर ही टेकडीवर प्रवेश बंद असतो. परंतु आता या टेकडींवर सिडकोतर्फे विकास केला जाणार असल्याने ही टेकडी सर्वांसाठी खुली होणार आहे. 

पोलिसांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार 
अनेक वर्षांपासून घरांचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई महानगर परिसरातील पोलिसांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये सिडकोमार्फत उभारणाऱ्या गृहप्रकल्पातील 4 हजार 466 घरे आरक्षित केली आहेत. यापैकी 1 हजार 57 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि 3 हजार 409 या अल्पउत्पन्न गटासाठी राखीव आहेत. या घरांची नोंदणी सोमवारपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे. 27 जुलै ते 27 ऑगस्ट या दरम्यान नोंदणी करून 29 ऑगस्टपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे. या योजनेची लॉटरी 15 सप्टेंबरला काढण्यात येणार आहे. 

पोलिसांच्या अतुलनीय कामाची पोचपावती 
पोलिस अविरतपणे दिवस-रात्र आपल्या जीवाची आणि परिवाराची पर्वा न करता आपल्या संरक्षणार्थ उभे असतात. अशा पोलिसांना हक्काचे व स्वप्नातील घर सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतून प्राप्त होणार आहे. ही एक प्रकारची त्यांच्या शौर्याला पोचपावती असल्याचे कौतुकोद् गार ठाकरे यांनी काढले.

पोलिसांसाठी तयार होणारी घरे ही पोलिसांच्या कुटुंबीयांच्या दृष्टिने फार मोठा निर्णय आहे. घरांचा हा पहिला टप्पा आहे. यापुढेही सिडको पोलिसांसाठी घरे तयार करेल.
- अनिल देशमुख, गृहमंत्री

--------------------------------------------------

Edited by Tushar Soanwane 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com