स्वप्नपूर्तीच्या रहिवाशांची सिडकोकडून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक इमारतींच्या स्लॅबला गळती लागली आहे. स्लॅबमधून पडत असलेल्या पाण्यामुळे संकुलातील २० पेक्षा जास्त इमारतींच्या लिफ्ट बंद पडल्या आहेत.

मुंबई : सिडकोने खारघर सेक्‍टर ३६ येथे तीन वर्षांपूर्वी वसवलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे संकुल आता समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक इमारतींच्या स्लॅबला गळती लागली आहे. स्लॅबमधून पडत असलेल्या पाण्यामुळे संकुलातील २० पेक्षा जास्त इमारतींच्या लिफ्ट बंद पडल्या आहेत. मुदत संपल्यानंतरही सोसायटी स्थापन करण्यात सिडकोकडून चालढकल करण्यात येत आहे. इमारतींमधील अंतर्गत गाळ्यांना रहिवाशांनी विरोध केल्यानंतर गाळे रद्द करण्याचा निर्णय सिडकोने अधांतरीतच ठेवला. सिडकोच्या या उदासीन कारभारामुळे फसवणूक झाल्याची  भावना रहिवाशांमध्ये आहे.  

खारघरला व्हॅलीशिल्प हा उच्च व मध्य उत्पन्न गटातील नागरिकांसाठी भव्य गृप्रकल्प उभारल्यानंतर या प्रकल्पाशेजारीच सिडकोने अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वप्नपूर्ती गृहसंकुल तयार केले. २०१७ पासून या प्रकल्पात रहिवासी राहायला यायला सुरुवात झाली. सिडकोने या सोसायटीतील इमारतींच्या देखभालीचे काम शिर्के विकासकाकडे देऊन स्वतः झोपण्याचे सोंग घेतले. पावसाळा सुरू झाल्यापासून संकुलातील अनेक इमारतींना गळती लागली आहे. गळतीमुळे लिफ्ट खराब होऊ नये, यासाठी २० पेक्षा जास्त इमारतींमधील लिफ्ट बंद ठेवण्यात येत आहेत. कधी-कधी तर दोन्ही लिफ्ट बंद पडत असल्यामुळे १४ व्या माळ्यावर जायचे कसे? असा प्रश्‍न रहिवाशांना भेडसावत आहे. काही इमारतींमध्ये लोक अडकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. 

याशिवाय इमारतींच्या गेटवर तैनात केलेली सुरक्षारक्षक व्यवस्था अत्यंत कुचकामी आहे. इमारतींच्या आवारात अनेक महिन्यांपासून बाहेरील अज्ञात वाहने बेवारस अवस्थेत उभी केली जात आहेत. सिडकोने सोसायटी स्थापन करण्याचे कामही रहिवाशांच्या अंगावर टाकून स्वतः निर्धास्त बसली आहे. सोसायटी स्थापन होण्यावरून रहिवाशांमध्ये एकमत होत नसल्याने सिडकोचे अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे या संकुलातील अनेक समस्यांमुळे नागरिक पुरते वैतागले आहेत.

सिडकोला गाळ्यांच्या निर्णयाचा विसर
स्वप्नपूर्ती सोसायटीतील अंतर्गत गाळे विक्रीला रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे. याबाबत आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी रहिवाशांची कैफियत ऐकून प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे सिडकोने ओटले विक्रीला एका शुद्धिपत्रकाद्वारे वगळले आहे; मात्र अंतर्गत गाळ्यांचा निर्णय अद्याप न घेतल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. याबाबत प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCO cheats residents of swapnapurti society in Navi Mumbai