सिडकोच्या गृहप्रकल्पाचा ताबा महागात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सिडकोने यशस्वी लाभार्थींना घराची रक्कम सहा हप्त्यांमध्ये चुकवण्यासाठी जून २०२० पर्यंतची मुदत दिली आहे. हे हप्ते चुकते केल्यावर ग्राहकांना प्रत्यक्ष घराचा ताबा घेण्यासाठी ऑक्‍टोबर २०२० पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थीवर एकाच वेळेला घराचे भाडे, बॅंकेचा हप्ता आणि घर चालवण्यासाठी पैसे अशी एकत्रित तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या महागृहप्रकल्पातील सुमारे १५ हजार घरांचा ताबा ग्राहकांना चांगलाच महागात पडण्याची शक्‍यता आहे. सिडकोने यशस्वी लाभार्थींना घराची रक्कम सहा हप्त्यांमध्ये चुकवण्यासाठी जून २०२० पर्यंतची मुदत दिली आहे. 

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने घोषित केलेल्या सुमारे १५ हजार परवडणाऱ्या घरांचा प्रत्यक्ष ताबा ऑक्‍टोबर २०२० ला मिळणार असल्याचे आश्‍वासन सिडकोने दिले आहे. सध्या तळोजा, कळंबोली, खारघर, द्रोणागिरी आणि घणसोली अशा पाच नोडमध्ये ११ ठिकाणी उभारल्या जात असलेल्या महागृहप्रकल्पाचे काम ५० टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहे. सिडकोचा हा प्रकल्प महारेरा कायद्यान्वये नोंदणीकृत असल्यामुळे कोणत्याही अवस्थेत उर्वरित ५० टक्के काम ऑक्‍टोबर २०२० पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे; परंतु त्याची रक्कम चुकती करण्यासाठी पणन विभागाने सहा हप्त्यांमध्ये विभागणी करून दिली आहे. अंतिम हप्ता चुकता करण्यासाठी ६ जून २०२० पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. परंतु हे हप्ते चुकते केल्यावर ग्राहकांना प्रत्यक्ष घराचा ताबा घेण्यासाठी ऑक्‍टोबर २०२० पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थीवर एकाच वेळेला घराचे भाडे, बॅंकेचा हप्ता आणि घर चालवण्यासाठी पैसे अशी एकत्रित तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

तारेवरची कसरत
सध्या सर्व लाभार्थी हे भाडोत्री घरात राहत असतील असे गृहीत आहे. बॅंकेने घराकरिता कर्जाचे हप्ते देण्यास सुरूवात केली की त्यानुसार कर्जाचा हप्ता फेडण्यासही सुरुवात होते. त्यामुळे लाभार्थीवर एकाच वेळेला घराचे भाडे, बॅंकेचा हप्ता आणि घर चालवण्यासाठी पैसे अशी एकत्रित तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

लाभार्थींना १८० दिवसांची मुदत मिळावी या नियमाने हप्त्यांची कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. विलंबाने हप्ता चुकवण्यासाठी मुदत हवी असल्यास ताबा देण्याआधीच रक्कम घेण्याचे निश्‍चित केले आहे.
- लक्ष्मीकांत डावरे, व्यवस्थापक, पणन-१, सिडको.

सिडको तयार करीत असलेला हा प्रकल्प महारेरा नोंदणीकृत असल्याने त्यावर रेरा कायद्यान्वये बंधने आहेत. मात्र ग्राहकाने पूर्ण रक्कम अदा केल्यावर घराचा ताबा देण्यास विलंब झाल्यास रेराकडे सिडकोविरोधात तक्रार करू शकतो. 
- अभिनय सिंग, कायदे सल्लागार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCO home project is expensive!