पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोकडून नवी मुंबईत घरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

‘सर्वांसाठी घर’ या केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोकडून नवी मुंबईत ९० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी २० हजारे घरे खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे खारघर आणि वाशी ट्रक टर्मिनल आदी मोक्‍याच्या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. 

खारघर: ‘सर्वांसाठी घर’ या केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोकडून नवी मुंबईत ९० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी २० हजारे घरे खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे खारघर आणि वाशी ट्रक टर्मिनल आदी मोक्‍याच्या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. 

त्यामुळे ग्राहकांना पनवेलमध्ये स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. घरे उभारणीचा ठेका कॅपासाईट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌स या कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली. 

सिडकोने कमी व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी नवी मुंबई, उरण, उलवे, वाशी आणि पनवेल पालिका हद्दीतील सिडकोच्या राखीव भूखंडावर ९० हजार घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः सिडकोने मोक्‍याच्या ठिकाणी बसस्थानक आणि वाणिज्य संकुलासाठी हे भूखंड राखीव ठेवले होते. या भूखंडावरही घरे उभारण्यात येणार आहेत. खारघरमध्ये रेल्वेस्थानक, खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या सेक्‍टर १ (अ); तर सेक्‍टर- १४ मध्ये बसस्थानकासाठी राखीव ठेवलेल्या रघुनाथ विहारशेजारील खारघर गाव मेट्रो स्थानकाशेजारील मोक्‍याच्या जागी घरे उभारली जाणार आहेत.

तसेच खारघर सेक्‍टर- ४३ मध्ये नावडे गावच्या मागील बाजूस, कळंबोली सेक्‍टर- १७ आणि नवीन पनवेल सेक्‍टर- १८ या ठिकाणी बस टर्मिनलसाठी राखीव असलेल्या जागेवर; तर खांदेश्‍वर रेल्वेस्थानक सेक्‍टर- २८ आणि वाशी ट्रक टर्मिनल आदी ठिकाणी २० हजारे घरे उभारली जाणार असून भूखंडाची स्वच्छता करून लवकरच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे एका  सिडको अधिकाऱ्यानी ‘सकाळ’ला सांगितले. खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल येथे बस टर्मिनलसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तळमजल्यावर बस टर्मिनल; तर इतर मजल्यावर निवासी वसाहती उभारल्या जाणार आहेत; त्यामुळे बस टर्मिनलचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. तसेच मोक्याच्या ठिकाणी, बाजारपेठेलगत नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार आहेत.

मोक्‍याचे भूखंड गेल्याने काही अधिकारी नाराज
सिडकोने खारघर रेल्वेस्थानक खाडीलगतचा आणि खारघर गाव मेट्रो स्थानकाशेजारील आणि वाशी ट्रक टर्मिनल आदी महत्त्वाच्या ठिकाणी वाणिज्य संकुल उभारून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा इतर प्रकल्पासाठी उपयोग करण्याचा संकल्प केला होता आणि त्यासाठी सदर भूखंड राखीव ठेवले होते. मात्र, पंतप्रधान आवास योजनेसाठी महत्त्वाच्या भूखंडावर निवासी वसाहती उभारल्या जाणार असल्यामुळे काही अधिकारी नाराज व्यक्त असल्याचे समजले. असो; परंतु या मोक्‍याचा ठिकाणी अल्पउत्पन्न कुटुंबांना घरे मिळणार असल्यामुळे अनेकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCO houses in Navi Mumbai under the Prime Minister Housing Scheme