शाळेसंदर्भात प्रकल्पग्रस्तांची सिडकोशी सकारात्मक चर्चा 

शाळेसंदर्भात प्रकल्पग्रस्तांची सिडकोशी सकारात्मक चर्चा 

नवी मुंबई - मोठा उलवे येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा स्थलांतरित करण्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना आल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. या वेळी शाळेसंदर्भातील प्रलंबित  मागण्या पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार उलवे येथील जिल्हा परिषदेची शाळा शैक्षणिक वर्ष (एप्रिल) संपेपर्यंत सुरू ठेवण्यास पंचायत समितीने परवानगी दिली होती. शैक्षणिक वर्ष संपल्याने शाळा स्थलांतरित करण्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना व्हॉट्‌सऍपद्वारे पत्र मिळाल्याने शाळेबाबतच्या प्रलंबित मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्तांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक संदीप माने यांची भेट घेतली. 

या वेळी ग्रामस्थांनी शाळेच्या सुरक्षेविषयक प्रश्न उपस्थित केले. तसेच, विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली स्कूल बस उलवे नोडमध्ये फिरवण्याची मागणी केली. शालोपयोगी साहित्य, साधने, पाण्याची सुविधा लवकरात लवकर शाळेत उपलब्ध करण्याबाबतही मागणी करण्यात आली. 

श्री नांदाई माता चार गाव पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रशांत भोईर यांनी सांगितले की, शाळांचे स्थलांतर एप्रिलनंतर होणारच होते; पण विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता शाळा सुरू होण्यापूर्वी नव्या शाळेच्या इमारतीत आवश्‍यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. 

शाळेबाबत ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा झाली. ग्रामस्थांनी शाळेला सुरक्षेसाठी प्रवेशद्वार लावून देण्याची मागणी केली आहे. ती संबंधित विभागाला कळवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांचीही व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना स्कूल बससाठीचा मार्ग देण्यास सांगण्यात आले आहे. 
- संदीप माने, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com