सिडकोचा "निवारा' कोलमडला 

सुजित गायकवाड  
मंगळवार, 2 एप्रिल 2019

गेल्या आठवडाभरापासून ते मोबाईल किंवा संगणकावर सुरू होत नाही. त्यामुळे अर्जदारांना माहितीसाठी पुन्हा सिडको कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. 

नवी मुंबई  - सिडकोच्या महागृहनिर्माण प्रकल्पातील अर्जदारांना घरबसल्याच त्यांच्या अर्जाची माहिती क्‍लिकवर मिळावी यासाठी सिडकोने सुरू केलेले "निवारा केंद्र संकेतस्थळ' बंद पडले आहे. गेल्या आठवडाभरापासून ते मोबाईल किंवा संगणकावर सुरू होत नाही. त्यामुळे अर्जदारांना माहितीसाठी पुन्हा सिडको कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. 

सिडकोने 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई विभागात 14 हजार 838 घरांची लॉटरी काढली होती. ते कामकाज पूर्णपणे संगणकीय पद्धतीने पार पडले होते. त्यानंतर अर्जदारांनाही त्यांची कागदपत्रे संगणकातून ऑनलाईनद्वारे सादर केल्यानंतर त्यांची छाननीही संगणकात व्हावी, पुढील चौकशीही ऑनलाईन पद्धतीने करता यावी यासाठी निवारा केंद्र हे ऑनलाईन संकेतस्थळ तयार केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते 7 मार्चला ते सुरू करण्यात आले. त्याला अवघ्या आठवडाभरात हजारोंनी भेट दिली. "सिडकोने लॉटरी सिडको डॉट कॉम' या संकेतस्थळावरही "निवारा केंद्रा'ची लिंक दिली आहे. मात्र काही दिवसांपासून मोबाईल व संगणकावर ते सुरू होत नाही. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे. गेल्या आठवडाभरापासून हे संकेतस्थळ बंद असल्याने सिडकोच्या कार्यालयात नागरिकांच्या पुन्हा रांगा लागल्या आहेत. 

कंपनी एक; कामे अनेक 
पुण्यातील प्रॉबीटी सॉफ्ट यांनी सिडकोकरिता हे निवारा केंद्र संकेतस्थळ तयार केले आहे. याच कंपनीने 14 हजार 838 घरांच्या लॉटरीकरिता सॉफ्टवेअर तयार करून दिले आहे. तसेच लॉटरीतील अर्जांची छाननी करण्याचे कामदेखील याच कंपनीला सिडकोने दिले आहे. 

संकेतस्थळ बंदबाबत तक्रारी नाहीत. काहींच्या संगणकात व्हायरस सुरक्षा सॉफ्टवेअर अथवा सुरक्षा सॉफ्टवेअर असल्याने किंवा काही जणांकडून मोबाईलचा बंद केलेला इंटरनेट सुरू करायचा राहून गेल्यामुळे निवारा केंद्र संकेतस्थळ सुरू होत नाही. 
- लक्ष्मीकांत डावरे, व्यवस्थापक, पणन-2. सिडको 

"सीएफसी' यंत्रणाही ठप्प 
नागरिकांना हवी असलेली कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रांचा तत्काळ निपटारा व्हावा याकरिता सिडकोकडे "सॅप' ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवनच्या तळमजल्यावरील "सॅप' केंद्रात जाऊन नागरिकांना आवश्‍यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे सादर केल्यावर संबंधितांना एक "सीएफसी' क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकाचा एसएमएस संबंधितांच्या मोबाईलवर येतो. त्याच सीएफसी नंबरवर पुढील चौकशी करावी लागते. मात्र हस्तांतरण, फायनल ऑर्डर आणि कर्जाकरिता ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना काही दिवसांपासून एसएमएस येणे बंद झाले आहे. याबाबत सीएफसी केंद्रात प्रमाणपत्र देण्याचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता काही दिवसांपासून एसएमएस सेवा बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे घरबसल्या सेवा देण्याचा सिडकोचा प्रयत्न फसला आहे.

Web Title: CIDCO shelter center website is closed