सिडकोच्या "स्वप्नपूर्ती'त स्वप्नभंग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

नवी मुंबई - खारघर येथे सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीतील गाळे आणि ओटले विक्रीस काढले आहेत. त्याला रहिवाशांनी विरोध केला आहे. प्रवेशद्वारावर असलेले ओटले विक्री करून सोसायटीमध्ये फेरीवाल्यांना छुपा प्रवेश देण्याचा सिडकोने घाट घातल्याचा आरोप केला आहे. सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. 

सिडकोने स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील घरे 2016 ग्राहकांना दिली. तेव्हापासून "स्वप्नपूर्ती'च्या मागे लागलेले शुक्‍लकाष्ट संपले नाही. घरांना गळतीपासून अंतर्गत नादुरुस्ती असे अनेक प्रश्‍न त्यामुळे रहिवाशांनी सिडकोकडे मांडले आहेत. वसाहतीत सीसी टीव्ही बसवणार असल्याचे सिडकोने लेखी आश्‍वासन दिले होते. त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वप्नपूर्तीमधील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. आता या वसाहती प्रवेशद्वाराशेजारी काही फुटांवर असलेले ओटले आणि इमारतींच्या आतील बाजूला तयार केलेले गाळे विक्रीस काढले आहेत.

इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळच्या ओटल्यांवर फेरीवाले बसणार असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच अंतर्गत गाळे विकल्यास सोसायटीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्‍यता वर्तवली आहे. रहिवाशांनी आज गाळे व ओटले विक्रीला तीव्र विरोध दर्शवणारे बॅनर "स्वप्नपूर्ती'च्या आवारात लावले आहेत. 

कोण दाद देणार? 
परवडणारी घरे या गोंडस नावाखाली सिडकोने ग्राहकांना 24 लाखांपासून ते 32 लाखांपर्यंतच्या महागड्या दरात घरे विकली; परंतु आज त्याच घरांवरून निर्माण झालेले प्रश्‍न सोडवण्यासाठी रहिवासी गेल्या अनेक महिन्यांपासून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत; मात्र त्यांच्याकडून प्रश्‍न सोडवणे तर दूरच; पण साधी भेटीसाठी वेळदेखील दिली जात नसल्याने दाद कोण देणार, असा प्रश्‍न भगवान केसभट या रहिवाशांनी उपस्थित केला.

Web Title: cidco Swapnuporti Housing Society

टॅग्स