esakal | सिडकोच्या ९० हजार घरांसाठी १९ हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोच्या ९० हजार घरांसाठी १९ हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिडकोतर्फे नवी मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या तब्बल ८९ हजार ७७१ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी १९ हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

सिडकोच्या ९० हजार घरांसाठी १९ हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या तब्बल ८९ हजार ७७१ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी १९ हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. परिहवन केंद्रीत विकास संकल्पनेवर आधारित या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सामान्यांना परवडणारी घरे तयार केली जाणार आहेत. 

शहरातील रेल्वेस्थानकांसमोरील मोकळ्या जागा, वाहनतळांच्या जागा व बस डेपोचा गृहप्रकल्प उभारण्यासाठी वापर होणार आहे. या घरांच्या निर्मितीसाठी अंदाजे १९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. २० ऑगस्टला संपन्न झालेल्या सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गृहनिर्मितीच्या पुढील प्रक्रियेस वेग प्राप्त होणार आहे. 

नवी मुंबईतील घरे उभारताना परिवहन केंद्रीत विकास धोरणावर भर देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या धोरणांतर्गत बस टर्मिनल व रेल्वेस्थानक आदी परिवहन सुविधा असलेल्या परिसरात घरे व कार्यालये विकसित केली जाणार आहेत. घर ते कामाचे ठिकाण यातील अंतर कमी करून लोकांचा प्रवासाचा वेळ वाचवणे तसेच सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करायचे आहे. फडणवीस यांच्या आवाहनानुसार सिडकोतर्फे ही गृहनिर्माण योजना नवी मुंबईतील विविध नोडस्‌मध्ये करण्यात येणार आहे. 

या गृहनिर्माण योजनेअंतर्गत तळोजा नोडस्‌सह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्‍वर रेल्वेस्थानकांच्या फोरकोर्ट एरियामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या पॅकेज अंतर्गत बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन्स टेक्‍नोलॉजी प्रा. लि. यांना २० हजार ४४८ घरे, दुसऱ्या पॅकेजअंतर्गत कपॅसाइट इन्फ्राप्रोजेक्‍ट. लि. यांना २१ हजार ५६४ घरे, तिसऱ्या पॅकेजअंतर्गत शापूरजी पालोनजी ॲण्ड कंपनी लि. यांना २१ हजार ५१७ घरे व चौथ्या पॅकेजअंतर्गत लार्सन ॲण्ड टुब्रो यांना २३ हजार ४३२ घरे बांधण्याचे काम देण्यात येणार आहे. चारही पॅकेजअंतर्गत प्रस्तावित असलेल्या घरांचे बांधकाम एकाच वेळी सुरू होणार असल्याने घरांचा ताबा लवकरात लवकर मिळणे शक्‍य होणार आहे. 

या परिसरात उभारली जाणार घरे
तळोजा नोडस्‌सह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्‍वर रेल्वेस्थानकांच्या फोरकोर्ट एरियामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. 

सिडकोच्या आजपर्यंतच्या गृहनिर्माण योजनांमध्ये नेहमीच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला आहे. नुकताच १५ हजार घरांचा गृहप्रकल्प पूर्णत्वास येत असताना आता सिडकोकडून आणखीन ९० हजार घरांच्या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकारण्याच्या प्रयत्नांना वेग येणार आहे. 
- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

loading image
go to top