सिडकोची बाजार संकुले ‘मद्यपींचा अड्डा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

ऐरोली, सेक्‍टर १५ मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल २७ वर्षांपासून वापरात नसल्याने ही इमारत जीवघेणी झाली आहे. हे ठिकाण गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असून येथे अनैतिक उद्योगही सुरू असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई : ऐरोली, सेक्‍टर १५ मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल २७ वर्षांपासून वापरात नसल्याने ही इमारत जीवघेणी झाली आहे. हे ठिकाण गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असून येथे अनैतिक उद्योगही सुरू असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी पावसामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीचे छत कोसळण्याची घटना घडली होती. सिडकोने वापरात नसलेल्या या बाजार संकुलाचा भूखंड पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका संगीता अशोक पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

ऐरोली, सेक्‍टर- १५ येथील भूखंड क्रमांक- २०/२१ येथे १९९५ मध्ये सिडको नागरिकांसाठी बाजार संकुल (मार्केट) उभारण्यात आले. सुमारे ५० ते ६० गाळे या बाजारात संकुलात आहे. सेक्‍टर- १५ परिसरात सिडकोने निवासी सिडकोच्या मालकीच्या इमारतीच्या उभारताना या मार्केटची उभारणी केली होती. सुरुवातीचे काही महिने या बाजार संकुलाचा व्यापाऱ्यांनी वापर केला; मात्र सुविधेअभावी मागील २७ वर्षांपासून बाजार संकुलामधील गाळे बंद आहेत. त्यामुळे संकुलाची सिडकोनिर्मित इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीच्या आतील आणि बाहेरील छत व सज्याचे छत अर्धाहून अधिक पडले आहे; तर आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

संकुलात गर्दुल्ले रात्रीच्या वेळी गांजा ओढतात. त्यामुळे अनेक गैरव्यवहार, मद्यपींचे बस्तान या इमारतीमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या पडीक इमारतीत वाढत्या गर्दुल्यांच्या अनैतिक धंद्यामुळे परिसरातील शालेय मुले व महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिडको या इमारतीचा कोणताही वापर करत नसल्याने, ही इमारत लोकोपयोगी उपक्रमाकरिता हा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी नगरसेविका संगीता पाटील यांनी केली आहे.

बाजार संकुलामध्ये रात्रीच्या वेळी मद्यपी मद्यपान करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी पोलिसांनी लक्ष ठेवणे 
आवश्‍यक आहे.
- राजेंद्र जोशी, नागरिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCO's Market Complexes 'Drunkards'