लाखोंच्या उधळपट्टीचा सिडकोचा नवा मुहूर्त

File Photo
File Photo

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देऊन तात्पुरत्या लांबणीवर ढकललेल्या सिडकोच्या स्नेहसंमेलनावरील उधळपट्टीला पुन्हा एकदा नवा मुहूर्त सापडला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात स्नेहसंमलेनासारख्या गोंडस नावाखाली नवी मुंबई, पनवेल व उरण भागातील जनतेकडून कररूपी गोळा केलेल्या लाखो रुपयांचा चुराडा केला जाणार आहे. शुक्रवारी सिडकोच्या प्रवेशद्वारावर झालेल्या कर्मचारी युनियनच्या बैठकीत उधळपट्टीचा अजेंडा तयार करण्यात आला.

गेल्या 50 वर्षांपासून स्नेहसंमेलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या उधळपट्टीचा 26 मार्चला "सकाळ'ने भांडाफोड केला होता. स्नेहसंमेलनावर 2017 व 2018 ला सुमारे एक कोटींच्या खर्चाच्या हिशेबाची कागदपत्रे "सकाळ'च्या हाती लागली. यात शाही जेवणावळीसहीत किरकोळ खेळांवर केलेला लाखो रुपयांचा खर्च "सकाळ'ने मांडला होता.

विशेष म्हणजे या खर्चावर सिडकोच्या लेखा परीक्षण विभागाने एक शब्दाचाही आक्षेप न नोंदवल्याची बाब समोर आली होती. "सकाळ'च्या या बातमीने सिडको प्रशासनाचे धाबे दणाणले होते. लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या समितीमधील कोणीही पुढे येऊन स्पष्टीकरण देण्यास तयार नव्हते. सिडकोची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या माहितीवर खुद्द व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी वारंवार संपर्क करूनही तेदेखील त्यावर बोलण्यास तयार नव्हते.

अखेर लोकसभा निवडणुकांचे कारण देऊन अचानक स्नेहसंमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता सर्व वातावरण निवळले असल्याचा भास करून कर्मचारी युनियनने स्नेहसंमलेनाच्या नावाखाली पुन्हा लाखो रुपयांच्या उधळपट्टीचा 9 ऑगस्टला घाट घातला आहे. 

कर्मचाऱ्यांची काम सोडून बैठकीला हजेरी 
शुक्रवारी दुपारी प्रवेशद्वारावर एक द्वारसभा झाली. जेवणाच्या वेळेत अर्ध्या तासात कर्मचाऱ्यांनी सभेचे कामकाज उरकण्याचे नियम असताना अगदी 4 वाजेपर्यंत सिडकोतील सुमारे 200 अधिकारी व कर्मचारी काम सोडून बैठकीत तोंडसुख घेत होते. त्यामुळे कार्यालयात कोणी जागेवर नसल्यामुळे अनेक नागरिक आले तसे रिकाम्या हाताने माघारी परतत होते; परंतु बलाढ्य अशा सिडकोच्या कर्मचारी युनियनला जाब कोण विचारेल का? असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com