कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात नागरीक संघचनेचे आंदोलन

सुचिता करमरकर
रविवार, 8 जुलै 2018

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ढासळत चाललेल्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी 'सेवा नाही तर कर नाही' या नागरिकांच्या संघटनेतर्फे सोमवारी (ता. 9 जुलै) आंदोलन करण्यात येणार आहे. 

मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात घडले आहेत. पालिकेपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या शिवाजी चौकात एका महिन्यात याच कारणाने दोन नागरिक बळी पडले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ढासळत चाललेल्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी 'सेवा नाही तर कर नाही' या नागरिकांच्या संघटनेतर्फे सोमवारी (ता. 9 जुलै) आंदोलन करण्यात येणार आहे. 
         
पालिका क्षेत्रात रस्ते अपघातात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची स्थिती, प्रशासनाचे दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष, खराब रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघात याबाबत व वस्तूस्थिती मांडणारे निवेदन यावेळी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना देण्यात येणार आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करते. याशिवाय रस्त्यांच्या विविध कामांसाठीही पालिका करदात्या नागरिकांच्या पैशांचा वापर करते. त्यामुळे चांगले रस्ते हा नागरिकांचा अधिकार आहे. याच कारणास्तव हे निषेध आंदोलन होणार असल्याचे श्रीनिवास घाणेकर यांनी स्पष्ट केले. शिवाजी चौक ते महंमद अली चौक हा नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी खचला असल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
           
ही कामे करणाऱ्या ठेकेदारांची दुरुस्तीची जबाबदारी, त्याबाबत करारानुसार असणाऱ्या अटी शर्ती याची माहिती घेतल्यास पालिका अधिकाऱ्याच्या कामाच्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. -  श्रीनिवास घाणेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Citizens agitation against bad condition of street at Kalyan Dombivali Municipal area