देशांतर्गत 'सफाई'त नागरिकांची मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

'तरुणांपासून मला नेहमीच स्फूर्ती मिळते. तरुणांच्या कामातूनच भविष्य घडण्यास मदत होईल. तरुण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात. त्यामुळे कोणतीही स्वप्नपूर्ती अशक्‍य नाही''

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मुंबई - देशात स्वच्छता मोहिमेचा आवाका वाढत आहे. सीमेपलीकडील सफाई असो किंवा काळ्या पैशांविषयीची देशातील सफाई असो, यात मला नागरिकांची मोठी मदत मिळत आहे, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मला इतक्‍या मोठ्या जनसमुदायासमोर केवळ बोलण्यास सांगितले आहे, गाण्यासाठी नाही. त्याअर्थी हे खूप स्मार्ट पाऊल आहे. अन्यथा तुम्ही शंभर रुपयांच्या नोटांमध्ये पैसे परत मागितले असते, अशी मिश्‍कील टिप्पणी त्यांनी या वेळी केली. ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हलनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजारो तरुणांशी संवाद साधला.

स्वच्छतेविषयी जनसामान्यांमध्ये मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. देशात कोट्यवधी शौचालये बांधली गेली आहेत. तरुणांची या आंदोलनात मोठी साथ मिळाली आहे. "कोल्ड प्ले'मुळे जुन्या फाइली आणि दिल्लीतील थंडीमधून माझ्यासाठी हा एक ब्रेक आहे, असे मोदी म्हणाले. याआधी 2014 मध्ये न्यूयॉर्क येथे ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. यंदा भारतात पहिल्यांदा हा फेस्टिव्हल होत असतानाही काही कारणास्तव हजर राहता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कुपोषण, बेरोजगारी, अस्वच्छतेचा सर्वांत मोठा परिणाम गरिबांवर होतो. म्हणूनच मी "सबका साथ, सबका विकास' हा मंत्र स्वीकारला आहे. गरिबांना सक्षम करण्यासाठीच "स्वच्छ भारत' मोहीम हाती घेतली आहे. सभोवताली कचरा न करण्याची बदललेली मानसिकता या यशाचा पहिला टप्पा आहे, असे मोदी म्हणाले.

Web Title: citizens help in domestic cleaning