मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा टोरंट पाॅवरला विरोध

मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा टोरंट पाॅवरला विरोध

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील नागरिकांना महावितरण कंपनीच्या ऐवजी टोंरटो या खासगी कंपनीच्या वतीने सेवा पुरवली जाणार आहे. पण या खासगीकरणाला स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. मात्र, टोरंटो कंपनीला राज्य सरकारने ही सेवा देण्यासाठी करार केला असल्याने या कंपनीच्या कारभाराला विरोध न करण्याचा इशारा ठाणे पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

टोरेंट पॉवरच्या शिळ, मुंब्रा, कळवा सर्कलचे वीज वितरण फ्रेंचायजी या विषयावर पोलिसांबरोबर नुकतीच बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत टोरेंट हटाओ कृती समितीचे सदस्य तसेच टोरेंटचे अधिकारी व महावितरण अधिकारी यांनाही बोलाविण्यात आले होते. या बैठकीत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना टोरेंट कंपनीचा शासनासमवेत लेखी करार झाला असल्याने कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा दिला. 

टोरेंट हटाओ कृती समितीने विविध प्रश्‍न उपस्थित केले. जसे, टोरेंट पॉवर कोणत्याही परवानगीशिवाय या क्षेत्रात काम करत आहे. यावर टोरेंट पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की वितरण फ्रेंचायजी करार महावितरणबरोबर अगोदरच झालेला असून त्या कराराच्या तरतुदीनुसारच प्राथमिक कामे जसे क्षेत्रातील विविध कनेक्‍शनचे सर्वेक्षण, महावितरण मालमत्तांचे सर्वेक्षण इत्यादी कामे केली जात आहेत. 

टोरेंट हटाओ कृती समितीने नमूद केले, की काही ठिकाणी केबल टाकण्याचे कामदेखील टोरेंट पॉवर कंपनीद्वारा केले गेले आहे. यावर टोरेंट पॉवर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की पावसाळा व रमझानदरम्यान महावितरणच्या आदेशानुसार त्यांना सहकार्य म्हणून त्यावेळेस काही कामे करण्यात आली. 

 कंपनीला शुल्क लागू करण्याचे अधिकार नाहीत 
टोरेंट पॉवर कंपनी मीटर बदली करून प्रत्येक ग्राहकाला 22 हजार रुपये शुल्क आकारत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या वेळी टोरेंट पॉवर कंपनीच्या वतीने स्पष्ट केले गेले, की टोरेंट पॉवर कंपनी फक्त सदोष झालेले मीटर बदलते. तथापि, यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नवीन कनेक्‍शनच्या बाबतही शुल्क हे एम.ई.आर.सी.च्या दरपत्रकानुसारच आकारले जाते. टोरेंट पॉवर कंपनीकडे कुठलेही शुल्क स्वतः लागू करण्याचे अधिकार नाहीत. तसेच वीज बिलदेखील एम.ई.आर.सी.च्या दरपत्रकानुसारच तयार केले जातात आणि हेच दर महाराष्ट्र वीज महामंडळातील सर्व ग्राहकांना लागू आहेत. 

वीजचोरांवर नियमानुसारच गुन्हे 
टोरेंट हटाओ कृती समितीने असाही आरोप केला, की टोरेंट पॉवर कंपनी चुकीच्या वीजचोरीच्या केस बनवते आणि आजच्या तारखेत 6500 लोकांवर टोरेंट पॉवर कंपनीद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावर टोरेंट पॉवर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की हे निराधार असून साफ खोटे आहे. केवळ वीजचोरांवरच नियमानुसार वीजचोरीची केस केली जाते. या वीजचोरांद्वारे अनधिकृत व असुरक्षित वीज नेटवर्क तयार केले जाते; जे सर्वसामान्यांसाठी घातक असून याद्वारे अपघात होतात. त्यामुळे अशा वीजचोरांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे व हे महावितरणद्वारादेखील महाराष्ट्रभर तरतुदीनुसार राबविले जाते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com